मुलाच्या प्रगतीबाबत पालक सजग--- लोकमत सर्वेक्षण

By Admin | Updated: July 21, 2014 23:38 IST2014-07-21T23:33:49+5:302014-07-21T23:38:42+5:30

शाळांशी सातत्यपूर्ण संपर्क : रत्नागिरीतील चित्र आशादायक

Parents aware about child's progress --- Lokmat Survey | मुलाच्या प्रगतीबाबत पालक सजग--- लोकमत सर्वेक्षण

मुलाच्या प्रगतीबाबत पालक सजग--- लोकमत सर्वेक्षण

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी
सध्याच्या शिक्षण पध्दतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. बदलत्या शिक्षण प्रणालीला आपल्या पाल्याचा कितपत प्रतिसाद आहे? तो घरी अभ्यास किती करतो? दैनंदिन गृहपाठ पूर्ण करतो का? गृहपाठाव्यतिरिक्त अभ्यासासाठी किती वेळ देतो? अन्य वाचन करतो का? शाळेने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये त्याचा असलेला सहभाग याबाबत सध्याचा पालकवर्ग जागृत होत असल्याचे मत शालेय मुख्याध्यापकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
पालकांमध्ये आई-बाबा दोघेही नोकरदार असल्यामुळे बहुधा पाल्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही. त्यामुळे शालेय अभ्यासासाठी वेगळी शिकवणी, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी वेगळा अभ्यासवर्ग, शालेय प्रकल्पासाठी इंटरनेटचा वापर, याशिवाय नृत्य, खेळ, पेंटिंगसारखे वर्ग लावले जातात. दिवसभर मुलगा किंवा मुलगी त्यामध्ये पूर्णत: व्यस्त असतात. एकूणच यामुळे मुलांवर होणारा परिणाम व शालेय शिक्षकांची वाढलेली जबाबदारी याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेमध्ये सध्याचा पालकवर्ग जागृत होत असल्याने शिक्षकांकडून आशादायी प्रतिक्रिया उमटल्या.
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण २७५० प्राथमिक शाळा, तर ३३८ माध्यमिक शाळा आहेत. शहरी व ग्रामीण भागात या शाळा असल्या तरी सर्व शाळांची परिस्थिती थोड्या फार फरकाने सारखीच आहे. पहिली ते नववीपर्यंत सर्व विद्यार्थी पास हा शासनाचा पॅटर्न राबवित असताना शाळांना मात्र स्वत:चा निकाल टिकविण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत आहे. त्यासाठी शाळांमध्येच जादा अभ्यासवर्ग आयोजित केले जात आहेत. शाळेचा निकाल जपण्यासाठी अर्थात् विद्यार्थ्यांवर परिश्रम घेणे ओघाने आले. मात्र, त्यासाठी पालकांचाही तितकाच प्रतिसाद लाभणे गरजेचे आहे. काही शाळांमध्ये प्राथमिक वर्गापासूनच लक्ष केंद्रीत केले जाते.
विद्यार्थ्यांची/पाल्यांची चौकशी करण्यासाठी येणाऱ्या पालकांची संख्या किती आहे? यावर बहुतांश सर्व शाळांनी ५५ ते ६० टक्के पालक स्वत:हून चौकशी करण्यासाठी येत असल्याचे सांगितले. पालकवर्ग जागृत होत आहे, विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती काय आहे किंवा तो अभ्यास करतो अथवा नाही, याबाबत दर आठवड्याला शाळेत येऊन पालक चौकशी करतात. मात्र, १० ते १५ टक्के पालक असे आहेत की, अपेक्षित असूनही पालक शाळेत येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत शिक्षकांना एकतर्फी प्रयत्न करावे लागतात.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील, विविध उपक्रमातील एकूणच त्याच्या प्रगतीचा ऊहापोह घेण्यासाठी शाळांमध्ये पालकसभेचे आयोजन केले जाते. त्यासाठी येणाऱ्या पालकांची संख्या ९० ते ९५ टक्के असल्याचे शाळांमधून सांगण्यात आले. काही शाळांमध्ये दरमहा पालकसभा आयोजित करण्यात येते. बहुतांश शाळांमध्ये वर्षातून दोन ते चार वेळा सभा आयोजित केली जाते. त्यावेळी एकूणच विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीबरोबर शैक्षणिक प्रगतीविषयी चर्चा केली जाते. विद्यार्थ्यामध्ये बदल घडवायचा असेल तर पालक व शिक्षक यांचा सुसंवाद होणे गरजेचे आहे. म्हणूनच पालक सभेला उपस्थित राहणाऱ्या पालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
शाळेत आयोजित केलेल्या पालकसभा असो वा अन्य कोणती सभा, याबाबत विद्यार्थी घरी निरोप पोहोचवतात का? याबाबत शाळांनी १०० टक्के प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले. बहुतांश शाळांनी डायरी पध्दतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे सभा असो वा अन्य कोणतीही सूचना डायरीमध्ये नमूद करून त्यावर पालकांची स्वाक्षरी आणण्याची सूचना केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरी निरोप पोहोचतो, पालक हजर होतात.
गुणवत्तायादी रद्द करण्यात येऊन शासनाने ग्रेड पध्दतीचा अवलंब केला आहे. मात्र, आजही विद्यार्थी सर्वोत्तम गुण संपादन करण्यासाठी अभ्यासात जोर लावतात. त्यासाठी शिक्षक मेहनत घेतात. पालकांचाही यात महत्त्वाचा वाटा आहे. पाल्याच्या भविष्यासाठी पालकांमध्ये होत असलेली जागृती निश्चितच उल्लेखनीय आहे.

दूरध्वनीवरुन केला जातो पालकांशी संपर्क
शाळेमध्ये गैरवर्तन किंवा अभ्यासातील कमजोरपणा यासाठी विशेषत: काही पाल्यांच्या बाबतीत पालकांना निरोप दिले जातात. निरोप मिळाल्यानंतर येणाऱ्या पालकांची संख्या किती आहे? यावर ८० ते ८२ टक्के असल्याचे शिक्षकवर्गाने उत्तरादाखल सांगितले. ५ ते ७ टक्के विद्यार्थी असे आहेत की, ते स्वत:हून घरी काहीच निरोप देत नाहीत. त्यामुळे काही शाळा पालकांचे फोन नंबर वर्षाच्या सुरूवातीला घेऊन ठेवतात. वर्गनिहाय विद्यार्थ्यांच्या नावासमोर पालकांचे नाव व फोननंबर समाविष्ट करून यादी तयार केली जाते. एखादा विद्यार्थी दोनपेक्षा जास्त दिवस शाळेत न आल्यास किंवा त्याचे वर्तन किंवा अभ्यास याबाबत थेट पालकांनाच फोन लावला जातो. काही शाळांचे मुख्याध्यापक स्वत: फोन लावून पालकांशी बोलतात. त्यामुळे पुढील काही तासात पालक शाळेत हजर होतात.

शाळेने पाठविलेल्या रिपोर्ट कार्डवर केवळ सही करीत नाही तर शाळेत जाऊन शिक्षकांची प्रत्यक्ष भेट घेतली जाते. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांच्या विविध उपक्रमांतील सहभागाविषयी, त्याच्या शाळेतील वर्तनाविषयी चर्चा केली जाते. परीक्षा असो वा अन्य स्पर्धा. मात्र, मुलांची आवड किंवा इच्छा असेल तरच सहभागी होण्यासाठी सूचवले जाते अन्यथा नाही. मुलांना अद्याप शिकवणी लावल्या नाहीत. शाळेतील शिक्षकांनी दररोज घेतलेला अभ्यास व गृहपाठ वेळच्या वेळी पूर्ण करून स्वत:चा अभ्यास स्वत: करण्यासाठी प्रेरित करण्यात येते.
- सौ. मानसी राजेश कांबळे, पालक, रत्नागिरी.

Web Title: Parents aware about child's progress --- Lokmat Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.