पालघर शिक्षक भरतीचा पॅटर्न कोकणात राबविणार : डावखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 14:25 IST2018-07-14T14:22:53+5:302018-07-14T14:25:44+5:30
पालघर जिल्हा परिषदेमध्ये स्थानिक तरुणांमधून करण्यात येणाऱ्या माध्यमिक शिक्षकांच्या भरतीच्या धर्तीवर कोकणातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी दिली.

पालघर शिक्षक भरतीचा पॅटर्न कोकणात राबविणार : डावखरे
सिंधुदुर्गनगरी : पालघर जिल्हा परिषदेमध्ये स्थानिक तरुणांमधून करण्यात येणाऱ्या माध्यमिक शिक्षकांच्या भरतीच्या धर्तीवर कोकणातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी दिली.
पालघर जिल्हा परिषदेने सेसफंडमार्फत जिल्हा परिषदेच्या शाळांशी संलग्न नववी व दहावीच्या वर्गावर रिक्त माध्यमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नऊ महिन्यांसाठी मासिक आठ हजार रुपये मानधनावर पदवी व बी. एड. शैक्षणिक अर्हता असलेल्या 120 उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
या निर्णयाचे आमदार डावखरे यांनी स्वागत केले आहे. तसेच पालघर जिल्ह्याव्यतिरिक्त रिक्त जागा राहिल्यास कोकणातील उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.
शिक्षण विभागात दहा वर्षांपासून शिक्षकांची भरती झालेली नाही. अशा परिस्थितीत कोकणातील स्थानिक तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याप्रमाणेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे जिल्हा परिषदांमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आमदार डावखरे यांनी दिली.
कोकणातील स्थानिक बेरोजगार डी. एड. व बी. एड. पदवीधारकांना स्थानिक स्तरावर नोकरीसाठी आपण कटीबद्ध असल्याचे डावखरे यांनी नमूद केले आहे.