पक्षभेद विसरुन संघटीत व्हा

By Admin | Updated: June 23, 2014 01:37 IST2014-06-23T01:25:35+5:302014-06-23T01:37:44+5:30

श्रीधर नाईक यांना आदरांजली : कणकवलीतील स्मृतिदिन कार्यक्रमात उमटले सूर

Organize by forgetting the aliases | पक्षभेद विसरुन संघटीत व्हा

पक्षभेद विसरुन संघटीत व्हा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा हा संस्कृतीयुक्त असून त्याला काही काळापूर्वी दहशतवादाची कीड लागली होती. ती नष्ट करण्यात लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काही प्रमाणात यश मिळाले आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षभेद विसरून संघटीतपणे दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यात यश मिळाल्यास तीच खरी श्रीधर नाईक यांना श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात कै. श्रीधर नाईक यांना उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली.
श्रीधरप्रेमी मित्रमंडळाकडून मातोश्री मंगल कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खा. विनायक राऊत, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, आ. प्रमोद जठार, आ. दीपक केसरकर, माजी आ. पुष्पसेन सावंत, गौरीशंकर खोत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, आबु पटेल, महिला आघाडीप्रमुख स्रेहा तेंडोलकर, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे, उद्योगपती विजय नाईक, कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक सुशांत नाईक आदी उपस्थित होते.
श्रीधर नाईक यांना आदरांजली वाहताना खासदार राऊत म्हणाले, नाईक यांची हत्या स्वार्थी राजकीय हेतूमुळे झाली होती. मात्र, स्वार्थी राजकारण्यांना शह देण्यासाठी आदर्शवत व संस्कृतीयुक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्ता मागील लोकसभा निवडणुकीत पेटून उठला होता. त्यांच्यामध्ये श्रीधर नाईक यांच्यासारखा सच्चा कार्यकर्ता संचारला होता. त्यामुळेच अभूतपूर्व असे यश मिळू शकले. स्वत:चा स्वार्थ समोर ठेवून विकासकामे करायची नसतात तर लोकांच्या सहभागातून विकासकामे करायची असतात याचे भान नसलेल्या राज्यकर्त्यांना धडा शिकवण्यासाठी येथील जनता सज्ज झाली आहे. यापुढे उपकारांची परतफेड परोपकारानेच केली जाईल, हीच इथली संस्कृती असून तिचे जतन करण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. श्रीधर नाईक यांना अभिप्रेत असे समाजकार्य आपण सर्वांनी एकजुटीने केल्यासच तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
सूत्रसंचालन बाळू मेस्त्री यांनी केले. विजय नाईक, आबु पटेल, अनिल हळदिवे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी श्रीधर नाईक यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Organize by forgetting the aliases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.