दोडामार्गात गॅस पाईप लाईनला विरोध
By Admin | Updated: June 30, 2014 00:09 IST2014-06-30T00:00:23+5:302014-06-30T00:09:14+5:30
बाबा राणे : गेल विरोधी मंच तहसीलदारांना निवेदन देणार

दोडामार्गात गॅस पाईप लाईनला विरोध
कसई दोडामार्ग : गेल कंपनीची गॅस पाईपलाईन दोडामार्ग तालुक्यातून गोवा येथे नेण्यात आली आहे. या पाईपलाईनची सुरक्षा हमी कंपनीने दिली नसल्याने या धोकादायक पाईपलाईनला तालुक्यातून सर्व पक्षीयांकडून विरोध झाला होता. आंध्रप्रदेश येथे गेल कंपनीच्या पाईपलाईनचा स्फोट झाल्याने पुन्हा एकदा दोडामार्गवासीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्वरित ही गॅस पाईपलाईन त्वरित बंद करून जोपर्यंत कंपनी सुरक्षिततेची हमी देत नाहीत, तोपर्यंत लाईन सुरू करू नये, या मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती गेल विरोधी मंचचे अध्यक्ष बाबा राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आंध्रप्रदेशमध्ये गेल कंपनीच्या गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. याच कंपनीची गॅस लाईन तालुक्यातून मोपा येथे नेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गेल विरोधी मंचच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य यशवंत आठलेकर, रंगनाथ गवस, गोकुळदास सुतार आदी उपस्थित होते.
डॉ. राणे म्हणाले, गोकाक ते गोवा अशी गॅस पाईपलाईन प्रस्तावित होती. त्यामध्ये दोडामार्ग तालुक्याचा समावेश नव्हता. तसेच पर्यावरण खात्याचीही परवानगी नव्हती. असे असताना ही धोकादायक पाईपलाईन दोडामार्ग तालुक्यातून नेण्यात आली. ही पाईप लाईन तालुक्यातील लोकवस्तीतून जात असून २० गावांचा यात समावेश आहे. त्यामुळे या लाईनला सर्व पक्षीयांनी प्रखर विरोध केला. मात्र, कंपनी ऐकण्यास तयार नसल्याने गेल विरोधी मंचची स्थापना करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, ही याचिका न्यायालयाने बाजूला ठेवली आणि गेल अंतर्गत न्यायालयात जा, असे सांगितले. मध्यंतरीच्या काळात निवडणुकीपूर्वीची आचार संहिता लागू झाल्याने याचा फायदा घेत पोलिसी बळाचा वापर करून ही जीवघेणी पाईपलाईन टाकण्यात आली. ग्रामस्थांच्या विरोधाला पोलिसांचा दंडुका दाखवून कंपनीने आपले काम पूर्ण करून घेतले.
परंतु अद्यापपर्यंत या गॅस पाईप लाईनच्या सुरक्षिततेची हमी कंपनीने दिलेली नाही. आंध्रप्रदेशमधील घटनेची पुनरावृत्ती येथेही घडण्याची भीती असल्याने कंपनी सुरक्षिततेची हमी देत नाही, तोपर्यंत गॅस पाईप लाईन त्वरित बंद करावी, असे निवेदन तहसीलदार देण्यात येणार आहे.
तसेच या पाईप लाईनला पर्यावरण खात्याचीही परवानगी नसल्याने आमदार प्रमोद जठार व अतुल काळसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करण्यात येणार आहे,
असे यशवंत आठलेकर यांनी सांगितले. (वार्ताहर)