इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध
By Admin | Updated: January 5, 2015 22:06 IST2015-01-05T21:26:15+5:302015-01-05T22:06:08+5:30
संघर्ष समितीची स्थापना : कोळोशी ग्रामस्थांची बैठक; आक्रमक भूमिका

इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध
नांदगाव : पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्र सीमा ठरविण्याबाबत कोळोशी ग्रामपंचायतीच्यावतीने जनसुनावणी सभा झाली. यावेळी ग्रामस्थांनी इको सेन्सिटिव्ह झोनला कडाडून विरोध दर्शवत संघर्ष समितीची स्थापना केली.
यावेळी सरपंच सुशील इंदप, उपसरपंच कृपाली इंदप, पंचायत समिती विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, कृषी सहायक बुधावळे, वनरक्षक अनिता वरक, तलाठी
मिलिंद पारकर, जिल्हा परिषद
सदस्य विभावरी खोत, पंचायत समिती सदस्य संतोष कानडे, आदी उपस्थित होते.
इको सेन्सिटिव्ह अहवालात कोळोशीचा समावेश झाल्याने येथील ग्रामस्थांनी याला विरोध दर्शविला असून यासाठी घेण्यात आलेल्या जनसुनावणीत ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवत विरोध करून उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे याबाबत समस्या मांडल्या.
यावेळी सरपंच सुशील इंदप म्हणाले, कोळोशी गाव हा आदर्श गाव, निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त असून या गावात पर्यावरण संतुलन आहे. जर इको सेन्सिटिव्हच्या जाचक अटी लागू झाल्यास गावच्या विकासाला खीळ बसणार आहे.
तसेच कोणत्याही कामाची परवानगी घेण्यासाठी सतत परवाने सादर करावे लागणार असून यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास होणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणारा कोणताही प्रकल्प नसताना कोळोशी गावात इको सेन्सिटिव्ह कोणत्या निकषावर लावण्यात आला, याबाबत शंका निर्माण होत आहे.
कोळोशी गावाचा समावेश इको सेन्सिटिव्हमध्ये झाल्यास गावातर्फे निदर्शने केली जाणार असून सर्व पातळीवर ग्रामस्थ लढा देणार आहेत. यासाठी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून यामध्ये प्रत्येक वाडीतील सदस्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
विरोध दर्शविणारे सुमारे २०० हून अधिक ग्रामस्थ जनसुनावणीवेळी उपस्थित राहिले होते. प्रत्येक ग्रामस्थ लेखी स्वरूपात निवेदन देणार आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य संतोष कानडे, जिल्हा परिषद सदस्या विभावरी खोत, ग्रामविस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
उपासमारीची वेळ येणार : सुशील इंदप
येथील ८० टक्के भाग शेतलागवडीस असून येथील शेतकरी आधुनिक शेतीच्या तंत्राचा वापर करीत आहेत.
जर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये गावाचा समावेश झाल्यास विविध प्रकारचे परवाने घेण्यास वेळ लागणार असून शेतीचा हंगाम संपण्याची वेळ येईल व येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे, असे इंदप म्हणाले.