रेल्वे दरवाढीला काँग्रेसकडून विरोध
By Admin | Updated: June 26, 2014 00:10 IST2014-06-26T00:07:36+5:302014-06-26T00:10:03+5:30
मळगाव स्थानकावर निदर्शने : भाजप सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा

रेल्वे दरवाढीला काँग्रेसकडून विरोध
तळवडे : देशभरात रेल्वे बोर्डाने प्रवासी आणि माल वाहतूक भाड्यात वाढ केल्याने काँगे्रस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात टीका सुरू आहे. जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्यावतीने सावंतवाडी मळगाव रेल्वेस्थानकावर काळे झेंडे दाखवून भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला. देशभरात रेल्वेबोर्डाने जी भाडेवाढ केली ती कमी केलीच पाहिजे. भाजप सरकारचा निषेध करीत आहोत, अशा घोषणाही दिल्या. हे आंदोलन जिल्हा काँगे्रसचे सेवादलचे अध्यक्ष अण्णा केसरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्यावतीने प्रदेशाध्यक्ष व काँग्रेसचे वरिष्ठ शिष्टमंडळ यांच्या आदेशानुसार, सावंतवाडी- मळगाव स्थानकावर रेल्वे दरवाढ संदर्भात निदर्शने करण्यात आली. सावंतवाडी रेल्वेस्थानकावर सावंतवाडी तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. रेल्वे दरवाढ कमी करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. सावंतवाडी रेल्वेस्थानकावर काँगे्रसचे कार्यकर्ते रेलरोको आंदोलन करणार असल्याची माहिती मिळताच सिंधुुदुर्ग पोलिसांचा फौजफाटा तसेच रेल्वे पोलीसही दाखल झाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांपेक्षा पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अधिक दिसत होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, रेल्वेची नासधूस होऊ नये, यादृष्टीने रेल्वे प्रशासनातर्फे ही खबरदारी घेण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी सावंतवाडी, मळगाव, वेत्ये, निरवडे गावातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रेल्वे रोको आंदोलन केले होते. आंदोलनाच्या तीव्रतेमुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. सावंतवाडी रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
या निदर्शनावेळी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, पंचायत समिती सदस्य नारायण राणे, सभापती प्रियांका गावडे, महिला तालुकाप्रमुख गीता परब, संजू परब, मळगाव सरपंच नीलेश कुडव, महेश सारंग, चंद्रकांत जाधव, माया चिटणीस, बेला पिन्टो, तळवडे सरपंच सुप्रिया कुुंभार, सुमेधा सावंत, शहराध्यक्ष मंदार नार्वेकर, सावंतवाडी तालुका कंझ्युमर्सचे प्रमोद गावडे, जिल्हा परिषद सदस्या निकिता जाधव, बाळा जाधव, उत्तम परब, निरवडे सरपंच उत्तम पांढरे उपस्थित होते.
निदर्शनादरम्यान रेल्वेस्थानकावर पोलीस फौजफाटा तैनात होता. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक रणजीत देसाई, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपविभागीय पोलीस अधिकारी उत्तम चौरे, वेंगुर्ले पोलीस अधीक्षक जगताप आदी पोलीस अधिकारी पोलीस दलासह उपस्थित होते. (प्रतिनिधी)