पुन्हाही मते विभागली आणि...

By Admin | Updated: October 20, 2014 00:39 IST2014-10-19T22:34:13+5:302014-10-20T00:39:07+5:30

भाजपच्या बाजूचा कौल ही आनंदाची बाब --विनय नातू

The opinions were divided and ... | पुन्हाही मते विभागली आणि...

पुन्हाही मते विभागली आणि...

संकेत गोयथळे- गुहागर -गुहागर मतदारसंघात पुन्हा एकदा युतीचे मतविभाजन झाल्याने आघाडी तुटूनही काँग्रेसच्या तुलनेत बलाढ्य असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर जाधवांचा गतवेळच्या तुलनेत तब्बल दीडपट अधिक म्हणजेच ३२ हजार ९६४ मतांनी सहज विजय झाला. मागील विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांना ५२ हजार ९२९, शिवसेनेचे रामदास कदम यांना ३९ हजार ८५८ व विनय नातू यांना २९ हजार ४४१ मते मिळाली होती. भास्कर जाधव यावेळी १२ हजार ९७० या मताधिक्याने विजयी झाले होते. यावेळी हे मताधिक्य ३२ हजार ७६४ एवढे वाढून गतवेळच्या तुलनेत यावेळी तब्बल १९ हजार ७९४ मते वाढली आहेत.  मागील विधानसभा निवडणुकीत रामदास कदम व विनय नातू यांची मते एकत्रित केल्यास भास्कर जाधव यांची मते यामधून वगळल्यास १६ हजार ४७१ एवढी मताची आघाडी होत होती. तसेच अन्य सात उमेदवारांना तब्बल १९ हजार मते पडली होती. विधानसभा निवडणुकीची खरी रंगीत तालीम लोकसभेला झाली. अनंत गीते कुणबी फॅक्टर व मोदी लाटेवर काही हजारांच्या मतांनी निवडून आले. तरीही गुहागर मतदारसंघातून सुनील तटकरे यांना ६३ हजार १२३, तर अनंत गीते यांना ६० हजार ५४९ मते मिळून तटकरेंचा सर्व प्रचार एकहाती घेणाऱ्या जाधव यांनी २ हजार ५७४ मतांची एवढी आघाडी दिली होती. यावेळी गीतेंच्या कुणबी फॅक्टरमुळे काही मते राष्ट्रवादीकडून निसटली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारसंघाशी थेट संपर्क ठेवणाऱ्या भास्कर जाधव यांना ही मते मिळाली, हे स्पष्ट होत आहे.
मागील विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर रामदास कदम फिरकले नाहीत, तर विनय नातू यांनी पहिली साडेतीन वर्षे राजकीय संन्यास घेत मतदारसंघाशी संपर्क ठेवला नव्हता. यामुळे खासकरुन कार्यकर्ते व मतदारांपर्यंत गेलेला चुकीचा संदेश कायम राहिला. प्रामुख्याने मोदी लाटेचा नातूंना फायदा होईल, असा आत्मविश्वास खुद्द नातूंना होता. तो फोल ठरला. भास्कर जाधव यांनी ६८१ मतांचे मताधिक्य राखले आहे.  निवडणुकीच्या सुरुवातीलाच नीलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना पाडण्यासाठी गुहागरमधून अपक्ष उभे राहणार असल्याची घोषणा करत दंड थोपटले. त्यामुळे राणे यांच्या बोलण्याचा कोणता परिणाम होणार का आणि त्यांनी जर जाधव यांच्याविरोधात काम केले, तर जाधव यांच्यावर त्याचा काही परिणाम होणार का? याबाबत मतदारसंघात विविध चर्चांना पेव फुटले होते. मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले.
या मतदारसंघात जाधव यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीतील असंतुष्ट गटाची मदत घेण्यात आली होती. मात्र सावंत यांना मिळालेल्या तुटपुंज्या मतामुळे विरोधकांचा मनसुबा धुळीस मिळाला. भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांच्या मतांची गोळाबेरीज केली तरी जाधव आघाडीवर आहेत. याचाच अर्थ त्यांच्या कामाला मतदारांनी अपेक्षित साथ दिली, असाच होईल. त्यांना ८० हजार मते मिळतील, अशी अपेक्षा होती.  प्रत्यक्षात त्यांनी घेतलेली मते ही कौतुकास्पद आहेत. गुहागर तालुक्यात गेले काही महिेने राणे यांनी जाधव यांना पाडण्यासाठी रसद पुरवल्याची चर्चा होती. चिपळुणमधील त्यांचे राजकिय विरोधक यावेळी पटलावर आले नसले तरीही लोकसभेतील त्यांना मिळालेल्या मतांच्या जोरावर काहींनी जाधव यांना धक्का बसेल, असे मानले होते. या साऱ्यांनाच जाधव यांच्या विजयाने चोख उत्तर दिले गेले आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातील मुस्लिम बांधवांनीही जाधव यांना स्विकारल्याचे आज निकालानंतर स्पष्ट झाले आहे. अडूर, वेळणेश्वर, हेदवी या पट्ट्यातही जाधव यांनी चांगली मते घेतली. आबलोली, तवसाळ, पडवे, जांभारी येथील आपली ताकद त्यांनी कायम ठेवली आहे.
आघाडी तुटल्यावर राणेसमर्थक संदीप सावंत यांना उभे करण्यात आले. अंतिम टप्प्यात काँग्रेसची मते भाजपकडे वळवण्याचा संदेश देण्यात आला. संदीप सावंत यांना मिळालेली ३ हजार ३१५ एवढी अल्प मते पाहता हे लक्षात येते. यातूनच गतवेळी नातूंना मिळालेल्या मतदानामध्ये १० हजार ३२० मते वाढली आहेत, तर गतवेळी शिवसेनेला मिळालेल्या मतामध्ये ७८७६ मते घटलेली दिसत आहेत.
गतवेळी मनसेच्या वैभव खेडेकर यांना ६ हजार ८४९ मते या मतदारसंघातून पडली होती. गुहागर तालुक्यातून मनसे नोटाचा वापर करणार, असे जाहीर करुनही यावेळी संपूर्ण मतदारसंघात १ हजार ६९३ नोटा (मते) पडल्याने मनसेची मते अन्यत्र विभागली गेल्याचे निवडणुकीतील निकालावरून स्पष्ट झाले आहे.

विकासकामाला मतदान झाले...
गुहागरातील जनता सतर्क आहे. केलेल्या विकासकामाला मतदान झाले, कोणीही कल्पना केली नव्हती. पण मी निवडणुकीपूर्वीच ७५ ते ८० हजार मते घेईन, असे जाहीर केले होते. याला यश आल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले.

भाजपच्या बाजूचा कौल ही आनंदाची बाब --विनय नातू
गुहागर चिपळूण मतदारसंघातून मी भाजपचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. निवडणुकीत पराभव झाला असला तरी महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरूध्द आणि भाजपच्या बाजूने कौल दिला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे, शब्दात विनय नातू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Web Title: The opinions were divided and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.