लाच घेणार नाही.. लाच देणार नाही !, दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली शपथ
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 31, 2022 16:58 IST2022-10-31T16:57:25+5:302022-10-31T16:58:00+5:30
यानंतर राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.

लाच घेणार नाही.. लाच देणार नाही !, दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली शपथ
सिंधुदुर्ग : शासनाने आजपासून ६ नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवूया’.. ‘लाच घेणार नाही.. लाच देणार नाही’.. अशी शपथ घेतली.
जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड उपस्थित होते.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी यावेळी शपथ वाचन केले. आपल्या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडथळा आहे, असे मला वाटते.
भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सरकार नागरिक आणि खासगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटितपणे काम करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. प्रत्येक नागरिकाने दक्ष रहायला पाहिजे. आणि सदैव प्रामाणिकपणा व सचोटी यांच्या उच्चतम मानकांप्रती वचनबद्ध असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी साथ दिली पाहिजे. याची मला जाणीव आहे.
म्हणून मी प्रतिज्ञा घेतो की, ‘जीवनाच्या सर्वक्षेत्रांत सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही. सर्व कामे प्रामाणिकपणाने आणि पारदर्शक पद्धतीने करेन. जनहितासाठी कार्य करेन व्यक्तिगत वागणुकीत सचोटी दाखवून उदाहरण देईन, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन’.
यानंतर राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदेशाचेही वाचन करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, नायब तहसिलदार दर्शना चव्हाण यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.