सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबतच्या नोंदींवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:26 PM2020-02-29T18:26:42+5:302020-02-29T18:27:54+5:30

पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबत चुकीच्या नोंदी आहेत. या आराखड्यातील बरीच माहिती सदोष असून, त्याला सावंतवाडीतील बांधकाम व्यावसायिक डॉ. दिनेश नागवेकर यांनी आक्षेप नोंदवित थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. हा आराखडा मराठीत प्रसिद्ध करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Objections on the records of the history of the Sawantwadi Institute | सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबतच्या नोंदींवर आक्षेप

सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबतच्या नोंदींवर आक्षेप

googlenewsNext
ठळक मुद्देसावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबतच्या नोंदींवर आक्षेपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार : विकास आराखड्यात चुकीच्या नोंदी

सावंतवाडी : पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबत चुकीच्या नोंदी आहेत. या आराखड्यातील बरीच माहिती सदोष असून, त्याला सावंतवाडीतील बांधकाम व्यावसायिक डॉ. दिनेश नागवेकर यांनी आक्षेप नोंदवित थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. हा आराखडा मराठीत प्रसिद्ध करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

येथील पालिका शहर प्रारूप विकास आराखडा प्रादेशिक विभाग नगररचना मुंबई यांनी प्रसिद्ध केला आहे. त्या आराखड्यामध्ये या शहराचा चुकीचा इतिहास नोंदविला गेला आहे. हा आराखडा मराठीत प्रकाशित करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून याबाबत तसेच चुकीच्या आरक्षण पद्धतीविरोधात शहरातील प्रसिद्ध बांधकामतज्ज्ञ डॉ. नागवेकर यांनी येथील पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन हरकत घेतली आहे.

पालिका प्रारूप विकास आराखड्याचा मसुदा मराठीतून द्यावा म्हणून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरसेवक व नागरिक यांनी मागणी करूनही त्याकडे नगररचना विभागाने साफ दुर्लक्ष करीत या मागणीला केराची टोपली दाखविली आहे. पालिकेच्या दर्शनी भागामध्ये सावंतवाडी संस्थानचा इतिहास लिखित स्वरुपात नमूद आहे.

या संस्थानचा इतिहास नगररचना विभागाने चुकीचा लिहिताना त्यामध्ये शहरासाठी पहिली पाणीपुरवठा योजना १८९३ मध्ये राजेसाहेब रावबहादूर सखाराम बोहेडेकर यांनी सुरू केली आहे असा चुकीचा उल्लेख केला आहे. मुळात संस्थानात बोहेडेकर नावाचे कुणीही राजा नव्हते. त्याकडे डॉ. नागवेकर यांनी लक्ष वेधत शासनाची घोर चूक दाखवून दिली आहे.

पालिका मुख्याधिकारी यांच्या निवासस्थान बांधकामासाठी नगरपरिषदेने निविदा काढली आहे. म्हणजेच नगररचना विभागाने त्याला मंजुरी दिली असताना पुन्हा आरक्षण क्रमांक ३० वर मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानासाठी आरक्षण टाकले आहे.

शहरातील लोकसंख्या १५ हजार १२० इतकी होती. तर २००१ मध्ये २२,९०१ व २०११ मध्ये २३,८५१ एवढी होती. दहा वर्षात फक्त या लोकसंख्येमध्ये ९५० एवढी वाढ आहे. दरवर्षी लोकसंख्येत सरासरी ९५ एवढी वाढ होत आहे. २०२६ मध्ये हीच लोकसंख्या वाढून ती ३५ हजारांपर्यंत जाईल, असा अंदाज डॉ. नागवेकर यांनी व्यक्त केला.

या संस्थानचे मुख्य ठाणे यापूर्वी नरेंद्र डोंगरावर होते; परंतु आता नरेंद्र डोंगर पालिका हद्दीत नाही. वन विभागाच्या ताब्यात असणारा नरेंद्र डोंगर व त्यातील स्थानिक उद्याने यांचा अप्रत्यक्ष लाभ शहराच्या नागरिकांना होत आहे.

शहराचा प्रारूप विकास आराखडा चुकीचा : नागवेकर

शहराचे एकूण क्षेत्र ६७८ चौरस किलोमीटर आहे, असे आराखड्यात म्हटले आहे. तेही चुकीचे असल्याचे डॉ. नागवेकर यांनी दाखवून दिले. शहरात ३१ मार्च २०१४ च्या आकडेवारीनुसार २६ हजार ५६५ एवढी वाहने आहेत, असा उल्लेख अहवालात आहे. त्यामध्ये दुचाकी १९ हजार २६८, मोटरकार २०४४, जीप ४१९, रिक्षा १९३३, रुग्णवाहिका २२, ट्रक १००६, चारचाकी डिलीव्हरी व्हॅन ४५७, ट्रॅक्टर ६६ अशी एकूण आकडेवारी सांगत आहे.

२०१४ ते २०१६ या दोन वर्षांत वाहनांमध्ये आणखी वाढ झालेली असावी म्हणजेच माणसापेक्षा २७१४ वाहने जास्त आहेत, याकडे नागवेकर यांनी लक्ष वेधले. १९९१ मध्ये या शहराची लोकसंख्या २१ हजार ३०५ होती. २० वर्षांत २५४६ एवढी वाढ झाली आहे आणि वाहने प्रचंड वाढली असा या शहराचा प्रारूप विकास आराखडा सांगत आहे, ते चुकीचे असल्याचे डॉ. नागवेकर यांनी सांगितले. मराठी भाषेत विकास आराखडा दिला तर लोकांना हरकत घेण्यास सुलभ होईल, असेही डॉ. नागवेकर म्हणाले.
 

 

 

Web Title: Objections on the records of the history of the Sawantwadi Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.