यापुढे राणेंच्या सभा काळोखामध्येच
By Admin | Updated: October 10, 2014 23:03 IST2014-10-10T21:28:26+5:302014-10-10T23:03:29+5:30
राजेंद्र म्हापसेकरांची भाजपाच्या मेळाव्यात टीका

यापुढे राणेंच्या सभा काळोखामध्येच
कसई दोडामार्ग : जिल्ह्यात नारायण राणे यांचे नेतृत्व असताना त्यांचे सदस्य फोडणे कोणाची हिम्मत होत नसे. मात्र, भाजपाने ते करुन दाखविले. तालुक्यात काँग्रे्रसचे दोन पंचायत समिती सदस्य फोडून भाजपात आणल्यामुळे नारायण राणेंना काळोखात सभा घेणे भाग पडले आणि यापुढेही तसेच होणार आहे. भाजपाच्या जीवावर निवडून आलेले आम्हालाच भाषा शिकवायला लागले आहेत, असे मत भाजपाचे उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी व्यक्त केले.
दोडामार्ग येथील सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. युती तुटल्याने भाजपावर शिवसेनेकडून होत असलेल्या टीकेबाबत म्हापसेकर म्हणाले, आजच्या शिवसैनिकांचे खरे प्रेम कुणावरही नाही. आज एका पक्षात, उद्या दुसऱ्या पक्षात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका म्हापसेकर यांनी केली. खरा शिवसैनिक शिवसेनेला कधी मदत करणार नाही. तो भाजपालाच मदत करेल.
माजी आमदार केसरकरांना आता शिवसेना जवळची वाटते. काही दिवसांपूर्वी हेच केसरकर शिवसेनेला दहशतवादी म्हणायचे. तसेच केसरकरांना भाजपातही येण्यासाठी निमंत्रण दिले होते, असे केसरकर सांगतात. मात्र, ज्यापक्षाने त्यांना मोठे केले, त्याच पक्षाचा त्यांनी घात केला, असे म्हापसेकर यांनी सांगितले.
काँग्रेसच्या दोन सदस्यांना भाजपाने सभापती व उपसभापती पदे दिली. नारायण राणे यांच्यावर प्रथमच नामुष्की ओढवली आहे. जिल्हा परिषद विषय सभापती व उपसभापती निवडणूक प्रथमच राणेंना रद्द करावी लागली. इतकेच नव्हे, तर दोडामार्गात रात्रीचा प्रचार करावा लागला आणि दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभा घेण्याची वेळ आली, अशी टीका नारायण राणे यांच्यावर केली. तर केसरकरांनी जातीचे राजकारण थांबवावे, अन्यथा तुमचे धंदे आम्हाला उघड करावे लागतील, अशा शब्दात म्हापसेकरांनी समज दिली आहे. (वार्ताहर)