शाळांना आता ‘आधार’चाच आधार
By Admin | Updated: July 4, 2015 00:12 IST2015-07-03T22:02:58+5:302015-07-04T00:12:02+5:30
बोगस पटनोंदणीला चाप : माध्यमिक शाळांची अस्तित्व टिकविण्याची धडपड

शाळांना आता ‘आधार’चाच आधार
सागर पाटील - टेंभ्ये -राज्यातील सर्व माध्यमिक शाळांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी यापुढे केवळ आधार कार्डचाच आधार घ्यावा लागणार आहे. शाळांच्या संचमान्यतेसाठी आधारकार्ड ओळखपत्र असणारे विद्यार्थीच ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यामुळे शाळास्तरावर होणाऱ्या बोगस पटनोंदणीला पूर्णत: चाप लागणार आहे. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून घेण्याची जबाबदारी शाळांची असून, यासाठी आवश्यक यंत्रणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी स्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सध्या सर्व शिक्षण संस्थांचे आॅनलाईन रजिस्ट्रेशन सरु आहे. यानंतर शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने एक अध्यादेश प्रसिद्ध केला असून, यानुसार संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक गृहीत धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील काही शाळांमध्ये बोगस विद्यार्थी नोंदवणे, पटावर जास्त विद्यार्थी दर्शवून जादा तुकड्यांची मागणी करणे, एकाच मुलाचे नाव अनेक शाळांच्या पटावर असणे यांसारखे अनेक प्रकार शासनाच्या निदर्शनास आले आहेत. आॅक्टोबर २०११ मध्ये झालेल्या पटपडताळणीमध्ये या बाबी सिद्ध झालेल्या होत्या. यामुळे शासन स्तरावरुन काढण्यात आलेल्या या नवीन आदेशानुसार सन २०१६-१७पासून कोणत्याही शाळेची संचमान्यता प्रदान करताना सर्व विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक असणे आवश्यक केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आधार क्रमांक मिळवून देणे ही शाळेची जबाबदारी आहे.
सध्या राज्यातील सर्व शिक्षण संस्थांचे आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले जात आहे. यामध्ये संस्थेची सविस्तर माहिती, विविध पुराव्यांसह अपलोड करणे आवश्यक आहे. संस्थेचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर याच लिंकवर शिक्षक, कर्मचारी यांची आॅनलाईन आधार नोंदणी केली जाणार आहे.
यामध्ये शिक्षकांच्या हाताचे ठसेही अपलोड करण्यात येणार आहेत. शिक्षक व कर्मचाऱ्यांची आॅनलाईन नोंदणी झाल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. या सर्व नोंदी झाल्या नाहीत तर शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचा आॅनलाईन पगार जमा करण्यात अडथळा येणार आहे.
या सर्व आॅनलाईन नोंदणीमुळे शाळेच्या स्थापनेपासून सर्व घटकांची आॅनलाईन नोंद होणार आहे. शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक, आयुक्त, शिक्षण सचिव अथवा मंत्र्यांना एका लिंकवर ही सर्व माहिती मिळणार आहे. शिक्षकाच्या हाताचे ठसेही अपलोड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकंदर आधारचे महत्व वाढते आहे.
विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सक्तीची आहे. राज्यामध्ये जवळपास ७० टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर आवश्यक यंत्रणा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शाळांनी आधारकार्ड नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तत्काळ काढून घ्यावे ही बाब आवश्यक आहे.
- सुनील जठार,
शिक्षक सहसंचालक, महाराष्ट्र राज्य