अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन २१ व्या दिवशी मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 18:07 IST2019-08-21T18:04:29+5:302019-08-21T18:07:07+5:30
जून-जुलै महिन्याचे मानधन चार दिवसात देण्याचे तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कृती समिती सोबत बैठक लावू असे आश्वासन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ३१ जुलै पासून सुरु केलेले असहकार आंदोलन २१ व्या दिवशी मागे घेतले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपले नियमित कामकाज सुरु करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या कमल परूळेकर यांनी केले आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन २१ व्या दिवशी मागे
सिंधुदुर्गनगरी : जून-जुलै महिन्याचे मानधन चार दिवसात देण्याचे तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कृती समिती सोबत बैठक लावू असे आश्वासन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ३१ जुलै पासून सुरु केलेले असहकार आंदोलन २१ व्या दिवशी मागे घेतले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपले नियमित कामकाज सुरु करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या कमल परूळेकर यांनी केले आहे.
केंद्र शासनाने आॅक्टोबर २०१८ पासून अंगणवाडी महिला कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. तसा आदेश राज्य शासनाने काढावा, या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्यावतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. त्यावेळी सत्ताधारी पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आश्वासन देण्यात आले. मात्र, कार्यवाही झाली नाही.
शासनाच्यावतीने जीआरही काढण्यात आला नाही. तसेच जून-जुलै महिन्याचे मानधन दिलेले नाही, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वृध्दापकाळात निवृत्ती वेतन देण्यात यावे. अशी मागणी कृती समितीने लावून धरली. ही मागणी महिला व बालविकास मंत्र्यांनी ११ जून २०१९ रोजी मान्य केली आहे. मात्र, त्याबाबतचा शासन निर्णय झालेला नाही.
आपल्या विविध प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने आक्रमक झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली ३१ जुलै पासून सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन सुरू केले होते. तसेच आपल्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत अंगणवाडी कर्मचारी कोणत्याही प्रकारचा मासिक अहवाल न देण्याचा तसेच कुठल्याही सभा आणि प्राशिक्षणामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.
नियमीत कामकाज सुरू करावे
मात्र आज मंत्रालयात झालेल्या चर्चेत जून जुलै महिन्याचे मानधन चार दिवसात देण्याचे तसेच वाढलेले घरभाडे, मदतनीसांना ५०० रुपये आणि सेविकाना २५० रुपये अतिरिक्त देणे, पेन्शन आदी मागण्यांसंदर्भात लवकरच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी बैठक लावण्याचे आश्वासन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ३१ जुलै पासून सुरु केलेले असहकार आंदोलन सोमवारी २१ व्या दिवशी मागे घेतले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपले नियमित कामकाज सुरु करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या कमल परूळेकर यांनी केले आहे.