सं. शारदाचे उत्तम सादरीकरण
By Admin | Updated: January 29, 2015 00:14 IST2015-01-28T22:08:23+5:302015-01-29T00:14:39+5:30
राज्य नाट्य स्पर्धा : पहिलाच प्रयत्न ठरला दर्जेदार--राज्य नाट्य स्पर्धा

सं. शारदाचे उत्तम सादरीकरण
संगीत राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेले संगीत शारदा हे नववे नाटक. हे नाटक पैसाफंड गिम्हवणे (गोडबोले आळी) दापोली, जि. रत्नागिरी या संस्थेने सादर केले. रंगमंचावरील व रंगमंचामागील प्रत्येक कलाकाराने आपापली भूमिका चोख बजाविल्यामुळे या नाटकाचे उत्तम सादरीकरण रसिकांना पाहायला मिळाले. संगीत शारदा म्हणजे जरठकुमारी विवाहाचे सर्वांना परिचित असणारे कथानक. त्यामुळे, या नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या नाटकामध्ये जवळजवळ सर्व पदे गायली गेली. बऱ्याचदा, यामध्ये मुख्य पदेच गायली जातात. वेळेची मर्यादा लक्षात घेता, या नाटकाचा काही भाग वगळण्यात आला. परंतु, कथानकाला कुठेही धक्का न लावता संस्थेने हे नाटक सादर केले. या संस्थेने संगीत राज्य नाट्य स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेतल्याचे चौकशीअंती समजले. तरीही नाटक अतिशय सफाईदारपणे सादर करण्यात आले. विलास कर्वे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन अतिशय चातुर्याने केलेले जाणवले. विशेषत: महिला मंडळावर मेहनत घेतल्याचे जाणवले. बऱ्याचदा, महिला मंडळ तटस्थपणे अभिनीत करण्यात येते. पण, या नाटकामध्ये ते खेळीमेळीने सादर केले गेले. प्रियांका दाबके (शारदा) यांनी प्रमुख भूमिका अभ्यासूपणे रंगवली. आवाज अतिशय सुरेल होता. त्यामुळेच, त्यांनी पदांनाही चांगला न्याय दिला. चेहऱ्यावरचे प्रसंगानुरुप बदलणारे भाव अतिशय बोलके होते. डॉ. प्रसाद दांडेकर (भुजंगनाथ) यांनी मोठ्या खुबीने भूमिका रंगवली.
कोदंड (प्रशांत काणे) भद्रेश्वर दीक्षित (मिलिंद कर्वे), इंदिरा (भाग्यश्री बिवलकर), वल्लरी (सौ. पूजा लागू) या भूमिकांसह इतर सहकारी कलाकारांनी आपापली कामगिरी समर्थपणे पेलल्याने सांघिक कामगिरी दर्जेदार झाली.
साकी गायन अजून दमदार व्हायला हवे होते. काहीवेळा वरचे स्वर लागत नव्हते. ताना घेताना काहीवेळा गळा फिरत नसल्याचे जाणवले. देविदास दातार (तबला), आनंद वैशंपायन (आॅर्गन) आणि नीळकंठ गोखले (हार्मोनियम) यांनी समर्पक साथसंगत केली. या नाटकामध्ये प्रवेश बदलताना प्रकाशयोजनेमध्ये एक-दोनदा घाई झाली. प्रवेश बदलताना पार्श्वसंगीत वाजवले जात होते. परंतु कथानक सादर होत असताना, संवाद म्हणताना योग्य तिथे पार्श्वसंगीत वापरले गेले असते, तर अधिक मजा आली असती.
नेपथ्याकडे विशेष लक्ष दिल्याचे जाणवले. नटी व सूत्रधार संगीत नाटकातून गायब करण्यात येतात. पण, या नाटकामध्ये नटी व सूत्रधारांची परंपरा जपण्यात आली. देविदास दातार यांनी चांगले संगीत दिग्दर्शन केले. या नाटकातील काही पदे प्रसिध्द आहेत. पण, जी पदे रसिकांना फारशी ऐकायला मिळत नाहीत, किंवा जी फारशी गायली जात नाहीत, अशी सर्व पदे या नाटकामध्ये ऐकायला मिळाली. पहिल्यांदाच नाट्यस्पर्धेत भाग घेऊनही ‘हम भी कुछ कम नहीं’ हे या उत्कृष्ट अशा नाटकाने दाखवून दिले.
संध्या सुर्वे