थंडावलेल्या बांधकामांना नव्या वर्षात मिळणार नवी ऊर्जा
By Admin | Updated: January 1, 2015 00:19 IST2014-12-31T21:41:26+5:302015-01-01T00:19:01+5:30
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गौण खनिजावर बंदी आणल्याने चिरेखाणी, वाळू, माती यांच्या उत्खननावर बंदी आली होती

थंडावलेल्या बांधकामांना नव्या वर्षात मिळणार नवी ऊर्जा
रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यात असलेली गौण खनिज बंदी न्यायालयाच्या निकालानंतर सुमारे दोन वर्षांनंतर उठविण्यात आली आहे. लवकरच पाच तालुक्यांमधील चिरेखाण व्यवसाय सुरू होणार असल्याने थंडावलेल्या बांधकामांना आता नव्या वर्षात गती मिळणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गौण खनिजावर बंदी आणल्याने चिरेखाणी, वाळू, माती यांच्या उत्खननावर बंदी आली होती. याचा परिणाम यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणावर झाला. या साऱ्यांचे व्यवसाय ठप्प झाले होते. एवढेच नव्हे; तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होेता. शासनाचे लिलाव थांंबले. पर्यायाने खासगी आणि शासकीय बांधकामे थंडावली. शासनाचा महसूलही थांबला होता. त्यामुळे शासनाचेही करोडो रूपयांचे नुकसान होत होते. गेली दोन वर्षे बंदीमुळे चिरे, वाळू उपलब्ध होणे कठीण झाल्याने बांधकामाच्या साहित्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यामुळे सामान्य माणसाचे घर बांधणे हे स्वप्नच ठरले आहे. तयार बांधकामांचीही तीच स्थिती. त्यामुळे याचा फटका सामान्य माणसालाही बसू लागला. तसेच याचा फटका शासकीय बांधकामांनाही मोठ्या प्रमाणावर बसत होता. काही कालावधीनंतर जिल्ह्यात अंशत: बंदी उठविण्यात आली. यावेळी रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगड या चार तालुक्यांना बंदीतून वगळण्यात आले. मात्र, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यांवर पुन्हा बंदीची टांगती तलवार राहिली होती. त्यामुळे पुन्हा या पाच तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिकांचे व्यवसाय पुन्हा थंडावले होते. परंतु आता या पाच तालुक्यांवरील बंदी इको सेन्सिटिव्ह १९२ गावे वगळून उठविण्यात आल्याने तालुक्यांमधील विविध बांधकामांना वेग मिळणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बंदी उठलेल्या पाच तालुक्यांमध्ये मात्र सध्या उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत. जिल्हा प्रशासनानेही आता यासाठी हिरवा कंदील दाखवल्याने बांधकामेही लवकरच मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता २०१५ या नव्या वर्षात थांबलेल्या सर्वच बांधकामांना गती मिळणार आहे. (प्रतिनिधी) पाच तालुक्यातील गौण खनिज बंदी उठल्याने त्या भागातील बांधकामांना गती मिळणार. थांबलेल्या कामांना गती मिळण्याच्या शक्यतेने बिल्डर लॉबी सुखावली. १९२ गावे वगळून बंदी उठविण्याच्या निर्णयाचा फायदा.