जिल्ह्यात ऊस तोडणी टोळ्याची गरज
By Admin | Updated: January 7, 2015 00:37 IST2015-01-07T00:32:17+5:302015-01-07T00:37:00+5:30
रोजगाराची संधी : जिल्ह्यातील ऊस क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ

जिल्ह्यात ऊस तोडणी टोळ्याची गरज
कणकवली : भात लागवडीकडून पैसे मिळवून देणाऱ्या ऊस लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. जिल्ह्यातील ऊस क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. या उसाच्या तोडीसाठी परजिल्ह्यातून टोळ्या आयात केल्या जातात. स्थानिक शेतकऱ्यांना ऊस तोडणीच्या टोळ्या तयार करण्याची संधी असून त्याची आवश्यकताही आहे.
सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षांत ऊस लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. जिल्ह्यातही ऊस शेती होऊ शकते, हे स्पष्ट झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे लक्ष दिले आहे. नगदी पिक असल्याने शेतकरी ऊस शेतीकडे वळत आहेत. १२ ते १४ ऊस तोडणी कामगारांची एक टोळी असते. ही टोळी एकावेळी एका शेतकऱ्याच्या उसाची कापणी करते. कोल्हापुरात अशा शेकडो ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या काम करतात. सध्या बीड येथील मजुरांच्या टोळ्या या क्षेत्रात जास्त कार्यरत आहेत. एकट्या गगनबावडा कारखान्याच्या ऊसतोडीच्या ४६९ टोळ्या काम करतात. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ऊस क्षेत्र वाढते
सिंधुदुर्गात ऊस लागवडीचे क्षेत्र गेल्या पाच वर्षांत वेगाने वाढते आहे. जिल्ह्यात सुमारे १ लाख ३० हजार टन ऊस उत्पादन होत असल्याची आकडेवारी आहे. गगनबावडा येथे साखर कारखाना असल्याने वैभववाडी व कणकवली तालुक्यांतील गावांमध्ये ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. या ऊस तोडणीसाठी जिल्ह्याबाहेरील ऊस तोडणी कामगार आणले जातात.
कणकवली व वैभववाडी तालुक्यात उसाची गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. ऊस क्षेत्र वाढत असून दिवसेंदिवस ऊस तोडणी कामगारांची गरज निर्माण होत आहे. स्थानिक युवकांना यातून रोजगाराची संधी निर्माण होत आहे.
- सतीश सावंत,
संचालक, जिल्हा बॅँक
टनाला २२४ रूपये
ऊस तोडणी कामगारांना टनामागे ऊस तोडणीसाठी मजुरी मिळते. सध्या एका टनाला २२४ रूपये दर मिळतो आहे. शासनाचा १९०.१६ रूपये अधिक अठरा टक्के कमिशन असा हा दर मिळतो. सराव असलेला ऊस तोडणी कामगार एका दिवसांत दोन टन उसही तोडतो. सिंधुदुर्गातील स्थानिक मजूर सुरूवातीला दिवसाला एक टन ऊस तोडू शकेल. त्यानंतर सरावाने तो जास्त ऊस तोडू शकेल, असे मत बावडा कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.