कणकवली : केंद्र तसेच राज्यातील शिवसेना- भाजप युतीचे शासन सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊन या शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. कणकवली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खड्डेमय रस्ते, वीज समस्या या बरोबरच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बेरोजगारीही वाढतच चालली आहे, अशा समस्यांकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी निवासी नायब तहसिलदार रविंद्र कडुलकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
रस्त्यांवरील खड्डे हे नेहमीचेच दुखणे बनले आहे. यासह विज समस्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा अनेक समस्या आहेत. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत आमच्या भावना शासन दरबारी पोहोचवाव्यात. नाहीतर येत्या काही दिवसात जनतेच्या समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या साथीने संघर्ष करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.तहसील कार्यालयात पोलिस बंदोबस्त !राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शासनाचा निषेध करीत कणकवली शहरातून मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिस प्रशासनाने जमाव बंदीचा आदेश असल्याचे कारण सांगून मोर्चाची परवानगी नाकारली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसिलदाराना निवेदन देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपनिरीक्षक सचिन नरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात मंगळवारी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.