केसरकरांच्या जाण्याने राष्ट्रवादी संपणार नाही : अबीद नाईक
By Admin | Updated: July 14, 2014 00:03 IST2014-07-13T23:53:42+5:302014-07-14T00:03:22+5:30
अपमान न होता नेहमी सन्मानच झाला

केसरकरांच्या जाण्याने राष्ट्रवादी संपणार नाही : अबीद नाईक
कणकवली : राष्ट्रवादी पक्षात आमदार केसरकर यांचा कोणताही अपमान न होता नेहमी सन्मानच झाला आहे. त्यांच्या पक्षातून जाण्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी संपणार नाही. केसरकर यांचा संभाव्य पक्षबदल हा पूर्वनियोजित आहे, असे प्रतिपादन युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी केले आहे.
अबीद नाईक म्हणाले की, आमदार दीपक केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू आहे. कोकणवासीय आणि आपला अपमान झाल्याचे केसरकर सांगत आहेत. मात्र, शरद पवार यांनी कोकणासाठी चांगले काम केलेले आहे. अखंड रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती, सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालय पवार यांच्या प्रयत्नांतून झाले आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना शंभर टक्के अनुदानातून फलोत्पादन योजना राबविण्या आली. त्याची गोडी जनता चाखत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने कोकणवासीयांचा अपमान कसा केला हे समजून येत नाही.
स्वत:च्या अपमानाबद्दल केसरकर बोलत असतील तर पक्षातील काही लोकांची नाराजी ओढवून केसरकर यांना पवार यांनी आमदारकीचे तिकीट दिले. केसरकर यांच्या सांगण्यावरून अजित पवार व शरद पवार यांनी कोट्यवधींचा शासनाचा निधी दिला. लोकसभा निवडणुकीदरम्यान कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सिंधुदुर्गची जबाबदारी होती. त्यांनी शरद पवार यांच्या सांगण्यानुसार सूचना दिल्या तर त्याला चुकीचे कसे म्हणणार?
लोकसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत निर्माण झालेल्या वातावरणाकडे दुर्लक्ष करत जिल्हाध्यक्ष डान्टस, कार्याध्यक्ष रेगे आणि मी यांना जाहीररित्या पुन्हा राष्ट्रवादीच्या प्रवाहात येण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी आम्ही पदांवरून बाजूला होण्यासही तयार होतो. मात्र, केसरकर यांचे शिवसेनेत जाण्याचे आधीच ठरलेले असेल तर त्याला कोणाचाही इलाज नाही. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते केसरकर यांच्या विचारांशी सहमत नाहीत.
या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या सूचनेनुसार नगरविकास राज्यमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषीभवनात दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहितीही अबीद नाईक यांनी
दिली. (प्रतिनिधी)