राष्ट्रीय पक्ष्याचं दर्शन झालंय दुर्मीळ
By Admin | Updated: December 29, 2014 00:00 IST2014-12-28T22:43:30+5:302014-12-29T00:00:46+5:30
मोरांची संख्या घटली : अधिवास सोडताना कधी जखमी झाल्यास उपचार हवेत

राष्ट्रीय पक्ष्याचं दर्शन झालंय दुर्मीळ
फुणगूस : मोर म्हटलं की, आपला पिसारा फुलवून थुईथुई नाचणारा मनमोहक पक्षी नजरेसमोर येतो. आभाळात काळे ढग जमा झाले की, कोकणात अनेक ठिकाणी जवळपास सकाळच्या किंवा सायंकाळच्या सत्रात आपला पिसारा फुलवून नाचणारा मोर हमखास दिसतो. परंतु अलिकडच्या काळात हे दृश्य फारच दुर्मीळ होत चालले आहे. आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराला गौरविण्यात येते. पण जंगलतोडीसह विविध कारणांमुळे आज मोराचे दर्शन दुर्मीळ होत चालले आहे.
पूर्वी कोकणात डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात मोर ‘म्यॉऽव म्यॉऽव’ असा केकारव करीत विहार करताना सर्रास दिसायचे. रस्त्यावर किंवा खेडोपाड्यात मोर फिरताना दिसायचे. परंतु आज मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मोरांच्या शिकारीमुळेही त्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड व मोरांची शिकार यांच्यावरती निबंध आणणे गरजेचे बनले आहे. तरच मोर व जंगल बचाव होईल. नाहीतर मोर हा पक्षी कालबाह्य होईल. पुढच्या पिढीला मोर फक्त इतिहास बनून वा केवळ चित्रात दिसेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
कोकणात अनेक ठिकाणी मोरांची संख्या अधिक असल्याचा दावा केला जात असला तरी मोरांच्या दुर्मीळ झालेल्या दर्शनाने पक्षीमित्र चिंता व्यक्त करीत आहेत. चिपळूण, सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या काही भागात मोर पाहायला मिळतात.
चिपळूण रावतळे भागात विंध्यवासिनी मंदिराच्या मागे असलेल्या धामणवणे परिसरात मोर मोठ्या प्रमाणावर आहेत. असुर्डे ते शिंदे आंबेरी या परिसरातही पाणवठ्यापासून मोकळ्या असलेल्या शेतजमिनीत मोर पाहायला मिळतात. निवळी, रायगड, पोलादपूरच्या अगोदर काही ठिकाणी घाटात मोर दृष्टोत्पत्तीस पडतात. मात्र, या सर्व परिस्थितीतही कोकणात मोरांसाठी एखादे क्षेत्र आरक्षित केल्यास व त्यांच्या निवासाचे केंद्र उभारल्यास पर्यटकांसाठी ही एक संधी उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)
जंगलातून रहदारीसाठी केलेले रस्ते व त्यामधून वाहतूक होत आहे. जंगलातील मोर अधिवासासाठी इकडून तिकडे जात असताना काही वेळा जखमी होतात. संबंधित व्यक्तीकडे संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी सूची नसल्याने त्यांच्यासमोरही अडचण निर्माण होते. वन विभागाने संपर्क सूची प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. एखाद्या जखमी पक्ष्यावर औषधोपचार करण्यासाठीही दवाखाना नसल्याने फारच गैरसोयीचे होते. यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- अनिकेत बापट, निसर्गमित्र चिपळूण