महेश सरनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकारण आगामी काळात पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. गेली २५ वर्षे नारायण राणे या सहा अक्षरांभोवती फिरत असलेली राजकीय नेतेमंडळी राणेंच्या नवीन निर्णयात त्यांना साथ देणार काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होणार आहे. पुढील काळात राणे यांनी भाजप प्रवेश केल्यास त्यांचे राजकीय शिलेदार त्यांची कास पकडून भाजपात प्रवेश करतील की आणखी कोणता मार्ग पत्करतील ? याबाबतचे अनेक प्रश्न सध्या विचारले जात असून या सर्वच प्रश्नांची उत्तरे गणेशोत्सवानंतर मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र, राणेंनी भाजप प्रवेश केल्यास जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणेंचा पराभव करून शिवसेनेचे विनायक राऊत पहिल्यांदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. तर त्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव करून शिवसेनेने जिल्ह्यातील गड पुन्हा मिळविला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक हे जायंट किलर ठरले. राणेंना हरवून कुडाळ मतदारसंघात ते आमदार झाले. तर सावंतवाडीत दीपक केसरकर यांनी निवडणुकीपूर्वी सेनेत प्रवेश करून आमदारकीसह मंत्री होण्याचा मानही मिळविला.
आता सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणेंच्या स्वाभिमान पक्षाविरोधात सेना-भाजपा युतीच्या माध्यमातून एकत्र होती. त्यामुळे राऊत यांनी दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मानही मिळविला. त्याचबरोबरीने २०१४ पेक्षा २०१९ मध्ये आपल्या मताधिक्यामध्येही वाढ केली. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. नारायण राणे हे कुडाळ-मालवण मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरणार की नाही? ते त्यांचे त्यांनाच माहीत. परंतु ते या निवडणुकीत कोणती भूमिका घेतात ? याकडे मात्र, संपूर्ण सर्वांचे लक्ष लागून आहे. राणे हे सध्या भाजपाकडून राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांच्या खासदारकीला केवळ एक वर्ष झाले. त्यातील अजून पाच वर्षे बाकी आहेत.मागील आठवड्यात एका खासगी वाहिनीवर झालेल्या मुलाखती दरम्यान, राणे यांनी आपण भाजपा प्रवेशासाठी इच्छुक असून याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे सूतोवाच केले होते. आगामी दहा दिवसांत याबाबतचा निर्णय न झाल्यास आपण आपली स्वतंत्र भूमिका जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. तर गेल्या चार-पाच दिवसांत नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील आपल्या घरच्या मैदानावर मातब्बर सहकाºयांना एकत्र करून आपल्या नवीन निर्णयात आपल्याला सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे. सोशल मीडियावर तर काही स्वाभिमानचे पदाधिकारी, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे ठरलंय... म्हणून पोस्टही टाकत आहेत.
युतीची गणिते अडकलीनारायण राणे यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यासाठी शिवसेनेचा विरोध आहे. तो विरोध पडद्यामागे असला तरी त्याबाबतची वाच्यता अनेकवेळा स्वत: राणे यांनीच बोलून दाखविली आहे.भाजपाला मात्र, राणेंसारखा राज्यातील ज्येष्ठ नेता हवा आहे. तसेच भाजपाची कोकणात असलेली ताकद वाढविण्यासाठी राणेंना पक्षात घेण्यासाठी काही नेतेमंडळी आग्रही आहेत. तर काही भाजप नेत्यांना राणे भविष्यात आपल्याला डोईजड होतील अशी भीती वाटत आहे. त्यामुळे द्विधा अवस्था पहायला मिळत आहे.युतीची गणिते अडकण्यामागे राणे पक्षप्रवेश हेही एक कारण असल्याचे बोलले जात आहे.काही नेते करणारशिवसेनेत पक्षप्रवेशनारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास राणे यांचे विरोधक म्हणून काम केलेले सध्या भाजपामध्ये असलेले काही नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते राणेंच्या निर्णयानंतर आपला निर्णय घेणार आहेत.सगळीकडे एकच चर्चाराज्यातही ठरतेय लक्षवेधीराजकीय वातावरण विधानसभा निवडणुकीमुळे ढवळून निघाले आहे. अगदी छोटासा जिल्हा असूनही राजकीयदृष्ट्या राणेंमुळे हा जिल्हा संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे.