राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्या मूक मोर्चा
By Admin | Updated: January 29, 2015 00:12 IST2015-01-28T22:20:42+5:302015-01-29T00:12:05+5:30
व्हिक्टर डान्टस : जिल्ह्यातील अपप्रवृत्तींच्या विरोधात

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्या मूक मोर्चा
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ३० जानेवारी रोजी दुपारी जिल्हाधिकारी भवनावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच ७ ते ८ फेब्रुवारी रोजी पुणे बालेवाडी येथे राज्यस्तरीय प्रतिनिधी संमेलन ‘चलो बालेवाडी’ या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून २०० कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रविण भोसले, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अबीद नाईक, युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, जिल्हा डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष राजू बेग, तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर, विश्वास साठे, गोपाळ गवस, उदय भोसले, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष डॉ. पूजा कर्पे, नगरसेवक कांबळे, वेंगुर्लेकर, कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, भास्कर परब, शिवाजी घोगळे, जिल्हा महिला उपाध्यक्ष भोळे, बाबी बोर्डवेकर, बी. डी. कांबळी, डॉ. मालंडकर यासह ८० प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
व्हिक्टर डान्टस म्हणाले की, ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद कृषी भवन येथे राष्ट्रवादीच्यावतीने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार असून नंतर दुपारी जिल्ह्यातील अपप्रवृत्तींच्या विरोधात जिल्हाधिकारी भवनावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी बालेवाडी येथे राज्यस्तरीय प्रतिनिधी संमेलन ‘चलो बालेवाडी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक तालुक्यातून २५ प्रमाणे जिल्हाभरातून २०० प्रतिनिधींना पाठविण्यात येणार आहे असा ठरावही बैठकीत घेण्यात आल्याचे डान्टस यांनी सांगितले. प्रविण भोसले यांनी कार्यकर्त्यांना संघटना वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करत मतभेद असल्यास बाजूला सारून पक्ष वाढवूया याबाबत चर्चा केली अशी माहिती डान्टस यांनी दिली. (प्रतिनिधी)
सरकारने ४७ हजार ७३१ जणांचा घास हिसकावला
राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या भाजप सरकारने सत्तेत आल्याबरोबर नोव्हेंबर महिन्यापासून केशरी कार्ड (एपीएल) लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्यात येत असलेली योजना बंद केली असल्यामुळे महाराष्ट्रातील २ कोटी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४७ हजार ७३१ (एपीएलधारक) लोकांच्या तोंडचा घास सरकारने हिसकावला असल्याचेही डान्टस यांनी सांगितले. तसेच ही योजना पूर्ववत होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.
रॉकेल पुरवठ्यात ७७ टक्क्यांनी झाली घट
सिंधुदुर्ग जिल्ह्याला जानेवारी महिलांसाठी १४४२ किलो लीटर रॉकेलची आवश्यकता होती. तशी मागणीही पुरवठा विभागाकडून करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यासाठी ३३६ किलो लीटर म्हणजेच मागणीच्या २३ टक्केच रॉकेल उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात रॉकेलची टंचाई भासणार असल्याचेही व्हिक्टर डान्टस यांनी सांगितले.
पक्षवाढीसाठी प्रदेशाध्यक्ष लवकरच जिल्ह्यात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटना आणखीन वाढावी तिची पाळेमुळे ग्रामीण भागात रूजवावी यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत असे व्हिक्टर डान्टस यांनी सांगितले.