संगीत मैफिलीने वेंगुर्लेवासीयांची संध्याकाळ भक्तिमय
By Admin | Updated: September 7, 2015 23:51 IST2015-09-07T23:51:13+5:302015-09-07T23:51:13+5:30
‘वृंदावनी वेणू’ कार्यक्रम : श्री देव रामेश्वर मंदिरात गवळण, भजनाचे सादरीकरण

संगीत मैफिलीने वेंगुर्लेवासीयांची संध्याकाळ भक्तिमय
सावळाराम भराडकर -- वेंगुर्ले--श्रीकृष्ण जीवनातील बाललिला, सवंगड्यांबरोबरचे खेळ, त्यातून उलगडणारी कृष्णलिला यावर आधारीत अभंग आणि गवळणीतून वेंगुर्लेवासीयांची संध्याकाळ भक्तिमय झाली. गायक आनंद तांडेल यांनी सादर केलेल्या विविध अभंग, गवळणी यांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह संगीतमय, भक्तिमय आणि कृष्णमय झाले होते. निमित्त होते ‘वृंदावनी वेणू’ या भक्तिसंगीत कार्यक्रमाचे. गोकुळाष्टमीचे औचित्य साधून श्री देव रामेश्वर मंदिर वेंगुर्ले येथे ‘वृंंदावनी वेणू’ या अभंग, गवळणींच्या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. गायक आनंद तांडेल यांनी आपल्या चौफेर गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘प्रथम वंदूया महागजाननाला’ या स्वरचित प्रार्थनेने तांडेल यांनी कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर ‘शिव शंकर शिव शंभो...’ हा अभंग रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला. वृंदावनी वेणू..., घोंगडीवाला कांबळीवाला..., या गवळणींनी रसिकांना काही वेळ श्रीकृष्णाच्या गोकु ळात असल्याची अनुभूती दिली. ‘मधुबन मे राधिका नाचे रे... या कोहिनूर या चित्रपटातील गीताने वेगळाच माहोल निर्माण झाला. दोन देवतांमध्ये बलवान कोण, असा मतितार्थ असलेल्या ‘सांगा कोण बलवान...’ हे गीत आपल्या सुरेल आवाजात सादर करून तांडेल यांनी रसिकांची वाहवा मिळविली. ‘ओम नमो नारायणा..., दत्त दत्त नामाचा महिमा...’ ही गाणीही रसिकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर सादर केलेल्या भैरवीत विविध दर्जेदार अभंगांची सुरेल गुंफण करीत कार्यक्रमाची सांगताही तितकीच रंगतदार केली. अभंग, गवळणींबरोबरच गायक तांडेल यांनी शास्त्रीय बंदिशी व तराणेही सादर केले. त्यांच्या सुरेल गायनाबरोबरच उत्कृष्ट संगीतसाथ आणि पूरक अशा निवेदनामुळे ही मैफील उत्तरोत्तर रंगत गेली. हार्मोनियमवादक संतोष नांदोसकर (वेंगुर्ले), तबला-अरूण केळूसकर (वेंगुर्ले-केळूस) यांच्यासह कोरस शांताराम कोठोरे (मुंबई), नामदेव धरत (मुंबई) प अशोक इंगले (मुंबई) यांनी संगीतसाथ केली. मुंबई येथील सुरेंद्र मुधोळकर यांनी आपल्या उत्कृष्ट निवेदनाने आपली छाप सोडली. सूत्रसंचालन महेश बोवलेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिनेश तांडेल, समीर तांडेल, सतीश तांडेल, विजय तांडेल, रघुनाथ तांडेल, सूर्यकांत तांडेल, मोहन कुदेकर, जयेश तांडेल, भानुदास मांजरेकर व श्री देव रामेश्वर ट्रस्ट यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वागत रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष नगरसेवक दाजी परब यांनी केले. आभार रामेश्वर देवस्थानचे सचिव वीरेंद्र परब यांनी मानले.