तिलारी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरुच
By Admin | Updated: July 14, 2014 00:02 IST2014-07-13T23:56:19+5:302014-07-14T00:02:48+5:30
ठिय्या आंदोलन सलग सहाव्या दिवशीही सुरूच

तिलारी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरुच
दोडामार्ग : येथील वनटाईम सेटलमेंटची रक्कम देण्यास शासन वेळकाढूपणा करीत असल्याने तिलारी धरणावरच तिलारी धरणग्रस्त बेरोजगार संघर्ष समितीने सुरू केलेले ठिय्या आंदोलन सलग सहाव्या दिवशीही सुरूच होते. जर शासनाने दखल घेतली नाही तर हे आंदोलन आम्ही धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या आमच्या मुळगावात जावून करू आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामास शासनच जबाबदार असेल असा इशारा आजच्या आंदोलकांच्या सहाव्या दिवशी संघर्ष समितीने दिला आहे.
तिलारी धरणासाठी जमिनी संपादित करताना शासनाने धरणग्रस्तांना घरटी एक नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने अखेर वनटाइम सेटलमेंटचा पर्याय समोर आला. त्यासाठी तिलारी धरणग्रस्त संघर्ष समितीने अनेकवेळा आंदोलनेदेखील केली. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने जलसमाधी घेण्याच्या प्रयत्न धरणग्रस्तांनी केला होता. मात्र, ७ जुलै रोजी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याची बैठक होण्याचे आश्वासन आमदार दीपक केसरकर यांनी दिल्याने जलसमाधी घेण्याचा निर्णय धरणग्रस्तांनी तूर्त स्थगित केला होता. परंतु त्यानंतर ७ जुलै रोजी होणारी बैठक झालीच नाही. परिणामी शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने मु्ख्य धरणावरच जावून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरूच आहे. शासनाने जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काही दिवसात हेच आंदोलन बुडीत क्षेत्रातील मोकळ्या जागेत जाऊन केले जाईल, असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत गवस व सचिव संजय नाईक यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)