‘तळकट’मध्ये हत्ती सोडल्यास आंदोलन
By Admin | Updated: April 23, 2015 00:41 IST2015-04-22T21:58:32+5:302015-04-23T00:41:57+5:30
एकनाथ नाडकर्णी : वनविभागाच्या निर्णयाला विरोध

‘तळकट’मध्ये हत्ती सोडल्यास आंदोलन
कसई दोडामार्ग : कुडाळ-आंबेरी येथील जंगली हत्तींना पकडून त्यांना प्रशिक्षित करताना गणेश हत्तीचा अचानकपणे मृत्यू झाल्याने धास्तावलेल्या वनविभागाने या हत्तींना सोडण्याचा निर्णय घेतला. हे हत्ती दोडामार्ग तालुक्यातील तळकट वनबागेत सोडण्याचा निर्णय घेतल्याने तळकट पंचक्रोशीतील बागायतदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी तळकट बागेत हत्ती सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
तळकट दशक्रोशी सुपारी, नारळ आदींच्या उत्पन्नाने संपन्न आहे. पाण्याचा बिकट प्रश्न आहे. तळकट वनबाग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. ही बाग लोकवस्तीत आहे. या बागेत वनौषधी झाडे, आंबा, नारळ, मसल्याची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ही बाग हत्ती स्थलांतर करण्यासाठी योग्य नाही. खाद्य अपुरे पडणार आहे. त्यामुळे हत्ती सोडल्यास उपासमारीची वेळ येणार आहे. तसेच येथील बागायती उद्ध्वस्त करणार. या बागायती येथील मुख्य व्यवसाय आहेत. त्यामुळे हत्ती येथे सोडण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. (वार्ताहर)
परिसरात वाघाचाही संचार
तळकट बागेत वाघाचा संचार असून एकाला जखमीही केले आहे. असे असताना वनविभागाने वाघाचा बंदोबस्त केला नाही. वाघाचा बंदोबस्त करता येणार नाही. परंतु जखमींना मदत दिली जाईल, असे सांगितले. प्रथम वाघ आहे, हे वनविभागाने नाकारले आणि नंतर वाघ असल्याचे फलक लावले. असे असताना तळकट वनबागेत जंगली हत्ती सोडण्यात येणार आहेत, असे समजले. या भागात बागायती आहे. त्यामुळे येथे हत्ती सोडण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच रमेश शिद्धे, फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विजयकुमार मराठे यांनी तळकट दशक्रोशीच्यावतीने दिला आहे.