चाकरमान्यांसाठी जादा रेल्वे धावणार
By Admin | Updated: September 29, 2014 00:05 IST2014-09-29T00:04:59+5:302014-09-29T00:05:11+5:30
कोकणातील उत्सवासाठी सोय

चाकरमान्यांसाठी जादा रेल्वे धावणार
कणकवली : नवरात्रोत्सव, विजयादशमीसाठी कोकणातील उत्सवांसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने वातानुकुलित डबलडेकरसह विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.
यानुसार मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस व करमाळी- लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांदरम्यान दोन्ही बाजूने मिळून एकूण चार फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. यापैकी करमाळी- एलटीटी ही गाडी वातानुकुलित डबलडेकर असून या गाडीचे आरक्षण सर्वसाधारण गाड्यांप्रमाणेच असणार आहे. गाडी क्र. ००११२ ही मडगाव- एलटीटी गाडी मडगावहून ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता सुटेल. ६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता ती एलटीटी येथे पोहोचेल. गाडी
क्र. ००१११ ही एलटीटी येथून सकाळी ९.०५ मिनिटांनी मडगावकडे रवाना होईल व रात्री ९.४० वाजता ती मडगाव येथे पोहोचेल. ही गाडी करमाळी, थिवीम, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल व ठाणे या स्थानकावर थांबणार आहे. या गाडीचे आरक्षण सुरू झाले आहे. ०२००५ ही एलटीटी- करमाळी वातानुकुलित डबलडेकर गाडी २ आॅक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता एलटीटी येथून करमाळीकडे रवाना होईल. सायंकाळी ४.३० वाजता ती करमाळी येथे पोहोचेल. ०२००६ ही करमाळी- एलटीटी गाडी ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता करमाळी येथून एलटीटीसाठी सुटेल व सायंकाळी ५.४० वाजता ती एलटीटी येथे पोहोचेल. या गाडीला ११ वातानुकुलित डबे असून ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड व थिवीम या स्थानकावर थांबेल. (प्रतिनिधी)