मागणीपेक्षा अधिक ‘गृहनिर्माण’ हीच समस्या
By Admin | Updated: July 28, 2015 00:26 IST2015-07-27T22:04:13+5:302015-07-28T00:26:06+5:30
मध्यवर्ती भागात सदनिकांना ग्राहकांची अधिक पसंती

मागणीपेक्षा अधिक ‘गृहनिर्माण’ हीच समस्या
‘असावे घरकुल अपुले छान’ हे स्वप्न प्रत्येकाच्या उराशी असतेच. त्यासाठी पैशांची जमवाजमव, योग्य परिसर, सोयी-सुुविधांची उपलब्धता या सर्व गोष्टींची जुळणी जेथे होत असेल, अशाच ठिकाणी ग्राहक घरांची खरेदी करतो. रत्नागिरी शहर व परिसराला गेल्या चार-पाच वर्षात विस्ताराचे वेध लागले आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून नोकरी धंद्यानिमित्ताने येथे येणारे लोक स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी केवळ शहर बाजारपेठेपुरतीच दाट वस्ती होती. आता मारुती मंदिर, साळवी स्टॉपपर्यंत वस्ती वाढत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहात आहेत. सेकंड होम म्हणूनही येथे सदनिकांना चांगली मागणी आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात जमिनींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सदनिकांचे चौरस फूट दरही वाढले आहेत. शहर व परिसरात होणाऱ्या गृह प्रकल्पांची संख्या मागणीच्या तुलनेत मोठी असल्याने अनेक ठिकाणी सदनिकांना पुरेसे ग्राहक नाहीत, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिक व पर्णिका असोसिएट्सचे संचालक प्रकाश साळवी यांच्याशी बांधकाम व्यवसायाबाबतची सध्यस्थिती नेमकी काय आहे, याबाबत दिलखुलास चर्चा केल्यावर या व्यवसायात मंदी नाही तर मागणीपेक्षा गृहनिर्माण प्रकल्प अधिक झाल्याने समस्या निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
प्रश्न : गेल्या तीन ते चार वर्षात रत्नागिरीत बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र, अनेक इमारतीत ६० ते ८० टक्के दरम्यानच सदनिकांची विक्री झाली आहे, अशी चर्चा होते. याबाबत वस्तुस्थिती काय आहे? व्यवसायात मंदी आहे काय?
उत्तर :बांधकाम व्यवसायात इतरांपेक्षा उशिराने आलो असलो तरी व्यावसायिक म्हणून गेल्या १८ वर्षांपासून रत्नागिरीकरांना परिचित आहे. बांधकाम व्यवसायाचा बऱ्यापैकी अभ्यास केल्यानंतरच या व्यवसायात पदार्पण केले. त्यामुळे गेल्या काही काळातील अभ्यासावरून एवढे सांगेन की, रत्नागिरीत चांगले बांधकाम व्यावसायिक आहेत. मात्र, घरकुल किवा सदनिकांची मागणी लक्षात घेता असंख्य सदनिका असलेल्या निवासी संकुलांची निर्मिती अधिक आहे. मागणी आणि पुरवठा यातील व्यस्त प्रमाणामुळेच सदनिकांची विक्री पूर्णत: न होता अंशत: झाली असे म्हणावे लागेल. याला मंदी म्हणता येणार नाही. मागणी व निर्मिती यांचा समतोल महत्त्वाचा घटक ठरतो. शहरातील मध्यवर्ती भागात जी गृहसंकुले उभी राहिली तेथे जागांच्या किमतीमुळे चौरस फुटाचे दर अधिक आहेत. असे असूनही सदनिकांची विक्री पूर्णत: झालेले अनेक प्रकल्प आहेत. गुणवत्ता, दर्जा याला रत्नागिरीकर नेहमीच पसंती देतात, असे रत्नागिरीतील माझ्या फर्निचर व्यवसायातून मला जाणवले. बांधकाम क्षेत्रातही तसेच आहे. जे दर्जा, गुणवत्ता देतात, त्यांच्या प्रकल्पातील सदनिकांची निश्चितपणे विक्री होत आहे.
प्रश्न : रत्नागिरी शहराचा मध्यवर्ती भाग व लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील नेमक्या कोणत्या भागात सदनिकांना अधिक मागणी आहे आणि तेथे सदनिका नोंदणीचा वेग किती आहे, कमी असेल तर का आहे?
उत्तर :रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील जागा आता जवळ जवळ संपुष्टात आल्या आहेत. त्याठिंकाणी अनेक गृहसंकुुले उभी राहिली आहेत. त्यानंतरचा गृहसंकुलांचा विस्तार हा मारुती मंदिर परिसर, थिबा पॅलेस विभाग, आरोग्य मंदिर परिसर, शिवाजीनगर, साळवी स्टॉप, नाचणे परिसर या भागात अधिक होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातच अनेक सुविधा एकवटल्या आहेत हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. या भागामध्ये शैक्षणिक सुविधा, बॅँका, जवळ असलेली बाजारपेठ, आरोग्यविषयक सुविधांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. बहुुतांश सुविधांची उपलब्धता असल्याने या मध्यवर्ती भागातच सदनिकांची मागणी अधिक आहे. या भागातील सदनिकांची किंमत अधिक असूनही ग्राहक येथे सदनिका घेण्यास प्राधान्य देतात, यामागे आणखीही कारणे आहेत. मध्यवर्ती भाग सोडून लांबच्या ठिकाणी सदनिका घेतल्यास कमी दरात मिळू शकते. परंतु तेथून येण्या-जाण्यात वेळ वाया जातो. वाहतूक, वाहनावरील खर्चही वाढतो. मध्यवर्ती ठिकाणी सदनिका सोयीसुविधांसाठी उपयुक्त असतेच, परंतु दगदगही होत नाही. त्यामुळे ज्यांची क्रयशक्ती आहे, असे ग्राहक या मध्यवर्ती भागातील गृहसंकुलात सदनिका घेणे अधिक पसंत करतात. अशा ठिकाणी सदनिका नोंदणीचा वेग अधिक आहे.
प्रश्न : केवळ मध्यवर्ती ठिकाण हाच सदनिका खरेदीचा निकष आहे की, अन्य काही गोष्टींचा विचार खरेदीदारांकडून केला जातो?
उत्तर :मध्यवर्ती ठिकाणी सदनिका अनेकांना हवी हे मान्य आहे. मात्र, ते अर्धसत्य म्हणायला हवे. मध्यवर्ती ठिकाणी खरेदी करावयाची सदनिका गुुणवत्ता व दर्जाच्या कसोटीवर तपासून घेणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. बांधकाम क्षेत्रातही स्पर्धा आहे. अलिकडच्या काळात सोयीसुविधा अधिक देण्यात येतात. त्यामध्ये वॉटर प्युरिफायर, टी. व्ही. ट्रॉलीज, फॅन्स, विद्युत दिवे, वीज खंडित होण्याच्या काळात लिफ्ट व अत्यावश्यक वीज वापरासाठी जनरेटर, वाहनतळाच्या ठिकाणी वाहनांच्या सुरक्षिततेसाठी सी. सी. टी. व्ही. यंत्रणा यांसारख्या अनेक सुविधांचा त्यात समावेश असू शकतो.
प्रश्न : नोंदणी कमी असण्याची समस्या नेमकी कोणत्या भागात अधिक आहे ?
उत्तर :मध्यवर्ती भागापासून लांबच्या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या मोठी आहे. मागणीपेक्षा प्रकल्पांची संख्या अधिक असल्याने तेथे चौरस फुटाचे दर कमी असूनही नोंदणी कमी आहे. आर्थिकदृष्ट्या सबल असणारे ग्राहक मध्यवर्ती भागात नोंदणी करतात. कमी उत्पन्न गटातील ग्राहक लांबच्या ठिकाणी नोंदणी करतात. हे लक्षात घेता मध्यवर्ती भागातील गृहसंकुलांमध्ये सदनिका शिल्लक राहण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, लांबच्या ठिकाणी अधिक गृहसंकुले झाल्याने सदनिका शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक आहे.
प्रश्न : ‘सेकंड होम’ संकल्पनेला कितपत वाव आहे.
उत्तर :मुंबई, पुणे व अन्य भागातील मूळ रत्नागिरीकरांनी शहरात सेकंड होम म्हणून सदनिकांची खरेदी करण्याचे प्रमाण थोडेफार आहे. भविष्यात हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
- प्रकाश वराडकर