मनसेला सार्वजनिक बांधकामने गंडविले
By Admin | Updated: July 12, 2014 00:24 IST2014-07-12T00:10:57+5:302014-07-12T00:24:47+5:30
मुदत टळली तरी कामाचा पत्ता नाही

मनसेला सार्वजनिक बांधकामने गंडविले
वैभववाडी : वैभववाडी बाजारपेठेतील गटाराच्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना गंडविले आहे. काम सुरू करण्यासंदर्भात मुदतीसह लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकामने मनसेला दिले होते. मात्र, लेखी आश्वासनाची मुदत टळून आठवडा उलटला तरी सार्वजनिक बांधकामकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही आणि मनसेनेही पुन्हा त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे गटाराचे घोंगडे भिजत पडले असून नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा गटाराचे काँक्रीट बांधकाम चालू दुरूस्ती योजनेतून मंजूर आहे. निधीअभावी दोन वर्षे काम रखडले असतानाच काही महिन्यांपूर्वी आधीच्या मक्तेदाराचा ठेका रद्द करून दुसरा मक्तेदार नेमण्यात आला. विशेष म्हणजे निधी नसतानासुद्धा खात्याने मक्तेदारास गटाराच्या कामाचा कार्यारंभ आदेश दिला, मात्र निधीची शाश्वती नसल्याने मक्तेदार काम करायला तयार नसल्याची खात्रीशीर वृत्त आहे.
गेल्यावर्षीच्या पावसाळ््यात खोदून ठेवलेल्या गटाराचा स्थानिक नागरिकांसह पादचारी आणि वाहनचालकांना त्रास होत आहे. त्याबाबत वृत्तपत्रांतून आवाज उठवल्यानंतर ३० जून रोजी मनसेच्या तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन गटाराच्या बांधकामाबाबत जाब विचारला होता. त्यावेळी २७ जून रोजी गटार बांधकामाचे रेखांकन मक्तेदाराला दिले असून ४ जुलैपर्यंत बांधकाम सुरू केले जाईल, असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकामने मनसे पदाधिकाऱ्यांना दिले होते.
बांधकाम विभागाने दिलेल्या आश्वासनाची मुदत टळून आठ दिवस उलटले तरी गटाराच्या कामाला सुरूवात होऊ शकलेली नाही. त्यावेळी पाऊसही नव्हता. त्यामुळे गटाराच्या कामात अडथळा नव्हता. परंतु सार्वजनिक बांधकामने लेखी आश्वासन देऊन मनसेला अक्षरश: गंडविले आहे. आश्वासनाची मुदत टळून गेली तरी मनसे पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष दिलेले नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निधी उपलब्ध नसताना मक्तेदान नेमला. तशा स्थितीत कार्यारंभ आदेश झाला. त्यानंतर रेखांकन दिले जाते आणि काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन देऊन निव्वळ धुळफेक केली जाते. ती नेमकी कशासाठी? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
पंचायत समितीचीही फसवणूक
७ जूनला पंचायत समितीची मासिक सभा झाली होती. त्यावेळी सभागृहात सार्वजनिक बांधकामचे अधिकारी सावंत यांनी पाऊस सुरू होण्यापूर्वी गटाराचे काम केले जाईल, असे सभागृहात स्पष्ट केले होते. मात्र सव्वा महिना उलटला तरी कामाचा पत्ता नसल्याने सार्वजनिक बांधकामने पंचायत समितीची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)