..अन्यथा पंतप्रधान मोदी मंत्रीपद काढून घेतील, आमदार केसरकरांचा राणेंना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 18:34 IST2021-11-23T18:33:52+5:302021-11-23T18:34:41+5:30
सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना समोरच्याची टिंगल करता येते. पण त्यांना आदर्श काम करता येत नाही. सिंधुदुर्ग ...

..अन्यथा पंतप्रधान मोदी मंत्रीपद काढून घेतील, आमदार केसरकरांचा राणेंना टोला
सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना समोरच्याची टिंगल करता येते. पण त्यांना आदर्श काम करता येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या पंचवीस वर्षांत त्यांना जेवढा निधी आणता आला नाही तेवढा मी पाच वर्षात आणला. त्यामुळेच त्याच्या नाकावर टिच्चून जनता मला सतत निवडून देत आहे. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री पद दिले याचा कोकणला अभिमान आहे. मात्र त्यांनी चांगल काम करून दाखवावे अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंत्र्याच्या कामाबाबत फार गंभीर असतात. त्यामुळे दिलेले मंत्रीपद ही काढून घेतील असा टोला माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केसरकर म्हणाले, माझी तुलना सरपंचा सोबत करता पण मी मंत्री असतानाही तसाच होतो. आणि आमदार असताना ही तसाच आहे. राणेंना मंत्री असताना लोक विचारतात आणि ते मंत्री नसले की ते सैरभैर कसे वागतात हे माहित आहे. त्यामुळे राणेंनी टिका करण्यापेक्षा कोकणचा विकास कसा करता होईल हे बघावे असेही केसरकर म्हणाले.
राणेनी गेल्या पंचवीस वर्षांत जेवढा निधी आणला तेवढा मी मागील पाच वर्षांत आणला. त्यामुळे त्यांनी टिका करताना विचार करावा. तसेच विधान सभेत चांगले काम केले नसते तर पाच वर्षे अर्थसंकल्प मांडला नसता. विरोधकांनी मला प्रश्न विचारले त्याची उत्तरे देता आली नसती असे सांगत राणेंनी केलेले आरोप खोडून काढले.
'ते' उघड करायला लावू नये
माझ्या विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत राणेंनी मला पाडण्यासाठी राजन तेली करवी निरोप पाठवला होता. पण तेव्हा त्यांच्या सरपंचानी हा निरोप धुडकावून लावला. हे उघड करायला राणेंनी लावू नये असा इशारा ही केसरकर यांनी दिला.
यावेळी या पत्रकार परिषदेस तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, अशोक दळवी, सुदन्वा आरेकर, योगेश नाईक उपस्थित होते.