सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती टिकवणे गरजेचे असल्यामुळे शिंदेसेना महायुतीतील पक्षांवर टीका करणार नाही, असे आमदार दीपक केसरकर म्हणाले. मध्यंतरी काही गैरसमज निर्माण झाले होते, जे उचित नव्हते. परंतु त्याबाबत त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केले आहे.
गरज पडली तर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याशीदेखील चर्चा करण्यास तयार आहे; कारण ते माझे चांगले मित्र आहेत, असेही त्यांनी सांगितले. हे विधान केसरकरांनी सोमवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम व तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते.आमदार केसरकर म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण परिसरातील ॲम्युझमेंट पार्कसह मळगाव आणि रेडीपर्यंतचा विकास होण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग या दोन्ही ठिकाणी जोडला जावा, अशी मुख्यमंत्र्यांनी फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. जर हा निर्णय सकारात्मक झाला, तर निश्चितच त्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठा लाभ होईल. त्या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आम्ही इंडोनेशिया आणि सिंगापूर येथे पर्यटनाच्या दृष्टीने दौरा केला आहे, जिथे मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा विस्तार झालेला आहे. उदाहरणार्थ, तिथल्या सोप्या हॉटेलमध्ये सुमारे पाचशे खोल्या आहेत, तर सर्वाधिक किमतीचे हॉटेल सात हजार रुपये प्रतिरात्र आहेत. त्या देशांप्रमाणे अनुभव घेऊन येथे पर्यटनाचा विकास व्हावा, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
महायुती म्हणून एकत्र राहूमहायुतीतील अंतर्गत वादांविषयी एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर केसरकर म्हणाले, या वादानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट मागितली. अनेक वर्षांनी, कदाचित पहिल्यांदा, या ठिकाणी सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. खासदार, पालकमंत्री तसेच आमदार हे सगळे महायुतीच्या पक्षातून आहेत. त्यामुळे जर सर्वजण एकत्र राहिले तर आगामी निवडणुकीत त्याचा निश्चित फायदा होईल; पण कोणाच्या वक्तव्यांमुळे कार्यकर्ते दुखावले जाणार नाहीत, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.