बंधाऱ्यासाठी मंत्र्यांची भेट घेणार
By Admin | Updated: June 27, 2014 01:02 IST2014-06-27T00:57:14+5:302014-06-27T01:02:01+5:30
प्रमोद जठार : तारकर्लीत २ जुलै रोजी अधिकाऱ्यांसोबत बैठक

बंधाऱ्यासाठी मंत्र्यांची भेट घेणार
मालवण : सागरी अतिक्रमणाच्या धोक्यामुळे देवबाग किनारपट्टीवर संकट निर्माण झाले आहे. हे संकट केवळ देवबाग गावावरील नसून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनावर झालेला हा आघात आहे. यामुळे देवबाग किनारपट्टीवर रस्ता कम बंधारा होण्यासाठी केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेणार तसेच २ जुलै रोजी तारकर्ली येथे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सागरी अतिक्रमणामुळे धोक्याच्या छायेत असलेल्या देवबाग गावाविषयी आमदार जठार यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यासोबत देवबाग किनारपट्टीची पाहणी करून आपली भूमिका मांडली.
यावेळी हॉटेल महाराजा येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार जठार म्हणाले, देवबाग गावावर आलेले संकट हे पर्यटन क्षेत्रासाठी आलेली नवी संधी आहे. मालवण किनारपट्टीवरील वायरी, तारकर्ली, देवबाग गावांमध्ये जिल्ह्याची पर्यटन राजधानी होण्याची ताकद आहे. या गावांमध्ये पर्यटन विकास झाल्यास दरडोई उत्पन्न वाढणार आहे.
अतुल काळसेकर म्हणाले, जिल्ह्याच्या पर्यटनात देवबाग हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. देवबाग गावावर सागरी उधाणामुळे संकट आले आहे. लहान बंधारे घालून तात्पुरत्या मलमपट्टीने हे संकट टळणार नाही. यासाठी देवबाग, तारकर्लीचा पर्यटन आराखडा तयार करून काँक्रीटचा रस्ता कम बंधारा आवश्यक आहे. याचा भविष्यात वापर होणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविला असल्याचे अतुल काळसेकर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक, बबन शिंदे, नितीन वाळके, विलास हडकर, बाबा मोंडकर, हरी खोबरेकर, भाऊ सामंत, आगोस्तिन डिसोझा यांच्यासह अन्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)