लाखोंची कामे अर्धवट
By Admin | Updated: June 3, 2015 23:47 IST2015-06-03T23:19:06+5:302015-06-03T23:47:08+5:30
सावडाव धबधबा : खर्च वाया, सुनियोजीत प्रयत्न करणे आवश्यक

लाखोंची कामे अर्धवट
मिलिंद पारकर - कणकवली -पावसाळा सुरू झाला की सावडाव येथील धबधबा सुरू होईल. सावडाव धबधबा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी लाखो रूपये खर्चून कामे करण्यात आली. परंतु कामे अर्धवट स्थितीत असल्याने पर्यटक सुविधांपासून यावर्षीही वंचित राहणार आहेत. सावडाव धबधबा विकसित करण्यासाठी अर्धवट कामे तत्काळ पूर्ण करण्यासोबत सुनियोजित प्रयत्न आवश्यक आहेत.
कणकवली तालुक्यात पर्यटन स्थळे कमीच आहेत. मालवण, देवगड, वेंगुर्लेसारखी तालुक्याला किनारपट्टी नाही. तालुक्यातील बहुधा एकमेव पर्यटनस्थळ असलेला सावडाव धबधब्यावर पावसाळ्यात स्थानिकांसह परजिल्ह्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.
मुंबई-गोवा महामार्गावरून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. धबधब्याच्या आजूबाजूला वस्ती नाही. पावसाळ्यानंतर सहा ते आठ महिने धबधबा सुरू राहतो. पर्यटनस्थळावर येण्यासाठी खासगी वाहनाशिवाय पर्याय नाही. कणकवलीपासून १८ किलोमीटर व महामार्गावर बेळणे फाट्यावरून ६ किलोमीटर अंतर पडते.
या ठिकाणी पर्यटन विकासांतर्गत गेल्या तीन-चार वर्षांत येथे पक्का रस्ता झाला. टॉवर बांधण्यात आला. त्या बाजूला चेंजिंग रूम, प्रसाधनगृहे, धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आदी कामे करण्यात आली आहेत. मात्र, प्रसाधनगृहांचे काम अर्धवट आहे. चेंजिंग रूमच्या पाईपलाईनचे कामही पूर्ण झालेले नाही. बैठकांचे साहित्य आणून टाकण्यात आले. मात्र, बैठका बसवण्यात आलेल्या नाहीत. टॉवरचे कामही निकृष्ट पद्धतीने केल्याचे दिसत आहे. रस्त्यासह एकूण कामासाठी सुमारे ८० लाख रूपये अपेक्षित आहे.
वर्षभरापूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमवेत या कामाची झडती घेतली होती. मात्र, त्यानंतरही कामात कोणतीही प्रगती झालेली नाही. धबधब्याच्या बाजूला खाद्यपदार्थ विक्रीसाठी म्हणून कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र, त्याच्या काचा फुटून गेल्या आहेत. देखभालीसाठी कोणीही पर्यटनस्थळावर नसल्याने मोडतोडीचे प्रकारही होत असून सर्व सुविधा रामभरोसे टाकण्यात आलेल्या आहेत.
हा परिसर निर्मनुष्य असून धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षारक्षक अथवा कोणीही जबाबदार व्यक्ती नसते. त्यामुळे महिलांसाठी वातावरण सुरक्षित नाही. पावसाळ्यात याठिकाणी युवा वर्ग मौजमजेसाठी जातो. प्रसाधनगृहातच चुली मांडून जेवण शिजवले जाते आणि मद्यपान केले जाते.
मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या मोठ्या फलकावर सावडाव धबधब्याचे छायाचित्र न लावता विजयदुर्ग किल्ला आणि वेंगुर्ले बंदराचे छायाचित्र लावण्यात आलेले आहे. त्याठिकाणी सावडाव धबधब्याचे छायाचित्र आवश्यक होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम ग्रामपंचायतीने ताब्यात घेण्यासाठी पत्र दिले आहे. मात्र, अपूर्ण असल्याने आम्ही ते घेतलेले नाही. रस्त्यासाठी लोकांनी आपली जागा, झाडे काढून दिली. परंतु बांधकाम विभागाने संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे शेती धोक्यात आली आहे. धबधब्यावरील सुविधा ग्रामपंचायतीच्या ताब्यात आलेल्या नसल्याने देखभाल होऊ शकत नाही.
- दत्ताराम काटे, उपसरपंच, सावडाव
शिस्त आणि सुविधांची गरज
सावडाव धबधबा हंगामी पर्यटन स्थळ असले तरी पावसाळ्याचे सहा ते आठ महिने येथे पर्यटन बहरू शकते. मात्र, त्यासाठी शिस्त आणणे गरजेचे आहे. पर्यटकांना कुटुंबासह येथे जाण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करू शकते. मात्र, अद्याप अर्धवट असल्याने हे बांधकाम ताब्यात घेण्यात आलेले नाही. धबधब्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थ मिळण्याची कोणतीही सोय नाही. हंगामात वडापाव, चहाचे स्टॉल तेवढे लावले जातात. गावात कोणाला सांगितल्यास जेवण करून दिले जाते. सावडाव धबधब्याच्या बाजूलाच परिसराचे विहंगम दर्शन घेण्यासाठी उंच टॉवर उभारण्यात आला आहे. मात्र, या टॉवरच्या रेलिंगचे काम निकृष्ट असल्याने टॉवरवर जाणे धोकादायक ठरू शकते. पर्यटनस्थळावर वीजेची अथवा पाण्याची सोय नाही. बोअरवेल मारण्याचे काम प्रस्तावित आहे.