गडनदीपात्रात मद्यपीने मारली उडी
By Admin | Updated: July 16, 2014 00:25 IST2014-07-16T00:19:09+5:302014-07-16T00:25:37+5:30
बचावासाठी नागरिकांची तारांबळ

गडनदीपात्रात मद्यपीने मारली उडी
कणकवली : येथील मराठा मंडळजवळील केटी बंधाऱ्यावरून एका मद्यपी व्यक्तीने गडनदीपात्रातील पाण्यात उडी मारल्याने एकच खळबळ उडाली. या व्यक्तीला वाचविण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्यांची एकच तारांबळ उडाली. मात्र, ती मद्यपी व्यक्ती काही अंतरावरून नदीकिनारा गाठत घरी पोहोचल्याचे काही वेळाने स्पष्ट झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेबाबत कणकवली शहरात जोरदार चर्चा सुरु होती.
मराठा मंडळ येथील बंधाऱ्यावरील गार्डस्टोनवर एक मद्यपी व्यक्ती मंगळवारी दुपारी बसली होती. या मार्गावरून जाणाऱ्या काहीजणांनी तिची विचारपूस केली असता आपले काही व्यक्तींशी भांडण झाले आहे. त्यामुळे नदीपात्रात मी उडी मारणार आहे असे त्याने सांगितले. त्यामुळे त्याची समजूत घालत रिक्षातून त्याला घरी पोहोचविण्यात आले. मात्र सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास तो मद्यपी पुन्हा बंधाऱ्याजवळ आला. तसेच त्याने गडनदीपात्रातील पाण्यात उडी घेतली. या मार्गावरून जाणारे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांनी त्या व्यक्तीला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
मात्र, तो सापडला नाही. शहरातही या घटनेबाबत माहिती समजताच अनेक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात कोणी उडी मारली याबाबत शोध घेण्यात येत असतानाच तो मद्यपी नदीपात्रातून वर आल्याचे स्पष्ट झाले. मद्यपीच्या या कारनाम्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर या घटनेबाबत कणकवली शहरात रात्री उशिरापर्यंत जोरदार चर्चा सुरु
होती. (वार्ताहर)