सावंतवाडी नगरपरिषदेत मोठा भ्रष्टाचार; बंद प्रकल्पावर कोटयावधीची उधळण, वसंत केसरकरांचा आरोप
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 23, 2023 17:45 IST2023-06-23T17:30:09+5:302023-06-23T17:45:40+5:30
ही उधळपट्टी म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे

सावंतवाडी नगरपरिषदेत मोठा भ्रष्टाचार; बंद प्रकल्पावर कोटयावधीची उधळण, वसंत केसरकरांचा आरोप
अनंत जाधव
सावंतवाडी : नगरपालिकेने विविध प्रकल्पांच्या परीक्षण आणि विकासाच्या नावाखाली लाखो रूपयांची उधळपट्टी चालली आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून केवळ ठेकेदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांना पोसण्याचे काम करून नगरपालिका जनतेच्या पैशांची लूट करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
केसरकर यांनी यावेळी माहितीच्या अधिकारात मिळविलेली कागदपत्रे सादर केली. यात काही बंद प्रकल्पांवरही खर्च दाखविण्यात आला आहे. सावंतवाडी पालिकेत सावळागोंधळ गेली कित्येक वर्षे सुरू आहे. नगरपरिषदेची सुधारित नळ योजना लोकवर्गणीअभावी अंमलात येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत ही उधळपट्टी म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
नागरिकांनी यातून गप्प राहावे की आवाज उठवावा, याचा निर्णय घ्यायचा आहे. निवडणूका आल्यानंतर मते विकली जातात. त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाला भाग पाडू असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी नगरपरिषदेने जिमखाना मैदान व डॉ. स्वार यांच्यासमोरील मैदानाचे परीक्षण करण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे. दर महिन्याला ९० हजारहून अधिक निधी खर्च केला जात आहे. यात कोणते परीक्षण व विकास केला जात आहे, हे अनाकलीय आहे. हेल्थपार्क प्रकल्प बंद असताना लाखो रुपये खर्च केले जात आहेत ही गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. यावेळी दीनानाथ बांदेकर, सोनाप्पा लाखे, प्रसाद आरविंदेकर उपस्थित होते.