मारुती घाटगेचे अपहरण

By Admin | Updated: June 29, 2014 00:50 IST2014-06-29T00:46:50+5:302014-06-29T00:50:28+5:30

पत्नीची वर्षभरानंतर तक्रार : सावंतवाडी पोलीस सांगलीकडे रवाना

Maruti Ghatge abduction | मारुती घाटगेचे अपहरण

मारुती घाटगेचे अपहरण

सावंतवाडी : आंबोली येथे पर्यटनासाठी आलेले सांगली येथील मारुती घाटगे (४०, रा. घालोवाडी, ता. पळूस, सांगली) हे आंबोली येथून नाट्यमयरित्या बेपत्ता झाले होते. आता वर्षभरानंतर मारुती घाटगेचे अपहरण त्याच्या मित्रांनी केल्याची तक्रार घाटगे यांची पत्नी संगीता हिने सांगली पोलीस ठाण्यात गुरुवारी दिली होती. त्याचा तपास शनिवारी सावंतवाडी पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, घाटगे यांचे अपहरण संगनमताने केल्याप्रकरणी संशयीत पोपट सुखराम खरमीर, विशाल वालचंद्र सोनवलकर, जयवंत पोपट माने, सतीश आत्माराम वायदंडे, गजानन शामराव जाधव, बाळासाहेब धर्मा पुजारी, अजित संभाजी आपटे (सर्व रा. पोळूस, सांगली) या सहाजणांवर सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी पोलिसांचे पथक सांगली येथे रवाना झाले आहे.
वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेल्या घाटगे यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे. मारुती घाटगे हे पोपट खरमीर, विशाल सोनवडेकर, जयवंत माने, सतीश वायदंडे, गजानन जाधव, बाळा पुजारी, अजित आपटे आदी मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी ६ आॅगस्ट २०१३ रोजी आंबोली येथे आले होते. धबधब्यानजीक मौजमजा केल्यानंतर येथीलच एका स्टॉलवर मक्याची कणसेही खाल्ली होती. त्यावेळी मक्याच्या कणसांवरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. या वादानंतरच घाटगे हे बेपत्ता झाले होते. त्यावेळी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे घाटगे बेपत्ता होण्याबाबत संशयही व्यक्त करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी घाटगे यांच्या पत्नीने कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. केवळ पती बेपत्ता असल्याची तक्रारच नोंदविली होती.
मात्र, वर्षभरानंतर तिने आपल्या पतीचे अपहरण त्याच्या मित्रांनीच केले असावे, असा संशय व्यक्त करत याबाबतची तक्रार सांगली पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. यात तिने मारुती घाटगे हे ठेकेदार असल्याने व्यावसायिक चढाओढीतूनच त्यांचे अपहरण झाले असल्याचा संशय त्यांची पत्नी संगीताने व्यक्त केला होता. ६ आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी साडेदहा वाजता संशयितांनी आपल्या पतीस फोन करून बोलावून घेतल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. फोनवरील या संभाषणाच्या अनुषंगाने मारुती घाटगे याला पर्यटनाच्या बहाण्याने आंबोली येथे आणण्यात आले आणि वर्षभर ते बेपत्ता असल्याने त्यांचा घातपात करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडूनही व्यक्त होत आहे.
दरम्यान, बेपत्ता मारुती घाटगे यांचे अपहरण पोपट खरमीर याच्यासह अन्य पाचजणांनी केले असून त्यांचा घातपात करण्यात आल्याच्या संशयावरून संगीता हिने सांगली व सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपींच्या शोधासाठी सावंतवाडी पोलिसांचे एक पथक सांगली येथे रवाना झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Maruti Ghatge abduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.