कवितेच्या संमेलनात घुमला ‘माऊली’चा जयजयकार
By Admin | Updated: December 1, 2014 00:06 IST2014-11-30T22:51:55+5:302014-12-01T00:06:36+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषद : कवी प्रशांत मोरेंनी गाजवली सायंकाळ

कवितेच्या संमेलनात घुमला ‘माऊली’चा जयजयकार
मंदार गोयथळे - असगोली -गुहागरमधील साहित्य नगरीमध्ये मसापच्यावतीने दोन दिवसांचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन सुरू झाले आहे. साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी उशिरा महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे यांच्या आईच्या कविता हा ५६०१ वा कार्यक्रम सादर झाला.
या कवितांच्या माध्यमातून कवी प्रशांत यांनी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, उपनगर तसेच ठाणे व कोकण विभागातील बोलीभाषेनुसार त्या - त्या भागातील जुन्या व नवोदित कवींनी आपल्या जन्मदात्या आईविषयीच्या भावना व्यक्त करणाऱ्या कविता एकत्र करुन त्या दिग्गज कवींच्या मनातील भावना आपल्याला लाभलेल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर यशस्वी मांडल्या आहेत. या कार्यक्रमाला कवी प्रशांत मोरे यांच्या आईच्या कविता असा नामोल्लेख करुन तो कार्यक्रम आज गुहागरमध्ये सादर करण्यात आला. त्या अनेक कवींच्या कवितांना आणि कवी प्रशांत मोरे यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी दाद दिली.
सुरुवातीला मराठीतील प्रसिद्ध कवी सुरेश भट यांनी ‘आई तुझ्या पुढे मी आहे अजुनि तान्हा...’ या कवितेपासून सुरुवात करून आईचा आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील भावार्थ व मर्म लक्षात आणून दिला. यानंतर महाराष्ट्राच्या टोकावर वसलेल्या विदर्भ व मराठवाड्याच्या भागातील वेगवेगळ्या भाषेमधून त्या भागातील दिग्गज कवी, गुरुवर्य कवी, सहकारी कवी व काही शिष्य असलेले कवी यांनी आपापल्या पद्धतीने आपल्या कवितांमधून मांडलेल्या आईविषयीच्या भावना कवी प्रशांत मोरे यांनी आपल्या कवितेच्या, गायनाच्या शैलीतून अतिशय सुरेखपणे सादर केल्या. यामध्ये त्यांनी आपले सहकारी अशोक बुरबुरे, शिष्य प्रणव, मराठवाड्यातील प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव, कवी सुरेंद्र, प्रशांत आयनाडे यांच्या सुंदर कविता यावेळी गाऊन दाखवल्या. महाराष्ट्राची माय म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचा उल्लेख केला. कवी प्रशांत मोरे यांनी जिजाऊ या नावाने लिहिलेली कविता आज पुणे येथील महात्मा फुले विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बी. ए.च्या मराठी विषयात समाविष्ट करण्यात आल्याचे सांगितले.
यानंतर आईबरोबरच बापही प्रत्येकाच्या जीवनात किती श्रेष्ठ व महत्त्वाचा आहे. याचा उल्लेखही जाणीवपूर्वक कवी प्रशांत मोरे यांनी केला. यावेळी आई - बापावरील आपली एक कविता सादर करताना त्यांनी ‘नारळाचे खोबरे बाप तर आई नारळाचे पाणी...’ असे सांगून आई आपले दु:ख सांगू शकते. परंतु आपल्या कुटुंंबाचा गाडा हाकताना आपला बाप मात्र कोणतेही दु:ख कोणाला सांगू शकत नाही किंवा व्यक्तही करीत नाही. त्यामुळे त्याविषयी लिहिताना कवी प्रशांत मोरे म्हणतात भावनांचा बांध फुटलेला असताना, बाप लढताना दिसतो कधी रडताना दिसत नाही, असा उल्लेखही त्यांनी आपल्या शब्दात केला. यावेळी प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांच्या ‘आधीच नव्हते काही, त्यातून गेली आई...’, संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी अशोक बागवे यांचे ‘आईच्या पदरापाशी भरतीची एकच लाट...’, डॉ. पू. वैद्य यांची प्रत्येकाच्या आईवरील कविता एक महाकाव्य... प्रसिद्ध अभिनेता व कवी नाना पाटेकर यांची मी लहान असताना खूप रडायचो, आई अंगाई म्हणायची आणि मी झोपायचो..., कवी देवानंद पवार ममं मायेचा चित्रांग मला भारत वाटतो, तिचा उडता पदर मला तिरंगा वाटतो..., कवी करडक यांची दिस मावळत होता, सांज काजळत होती..., आदी कवींच्या कविताही मोरे यांनी यावेळी सादर केल्या. शेवटी आई निघून गेल्यानंतर लिहिलेली पाणी यायची बळ, वळाण बांधव, भरताराच्या भय, मराणं सांगाव... अशी कशी जाईल ती, राणी माहेरीला गेली, राणी गेली माहेरीला, दोन दिसाच्या बोलीवरा... अशा दोन कविता त्यांनी शेवटी सादर केल्या.