The mango season will be delayed this year, with conditions in Sindhudurg | आंबा हंगाम यावर्षी लांबणीवर पडणार, सिंधुदुर्गातील स्थिती
आंबा हंगाम यावर्षी लांबणीवर पडणार, सिंधुदुर्गातील स्थिती

ठळक मुद्दे आंबा हंगाम यावर्षी लांबणीवर पडणार, सिंधुदुर्गातील स्थितीबागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण, क्यार वादळाचा फटका

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्यार वादळ व अवकाळी पावसाचा परिणाम पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर झाला आहे. त्यामुळे यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.

यावर्षी ह्यक्यारह्ण वादळाचा व अवकाळी पावसाचा फटका भातशेती व मच्छिमारी व्यवसायासह आंबा बागायतदारांना बसला. आॅक्टोबर ते नोव्हेंबर या पहिल्या टप्प्यात येणाºया मोहोरावर अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. या पहिल्या टप्प्यातील या मोहोरामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आंबा तयार होतो व बागायतदारांनाही चांगला दर मिळतो.

मात्र, पावसाने बागायतदारांच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्यामुळे बागायतदार चिंतातूर आहेत. या वातावरणामुळे आंबा कलमांना पालवी येण्याची शक्यता जास्त असून बागायतदारांना आंब्याला मोहोर येण्यासाठी डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या टप्प्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. मात्र, तेसुद्धा थंडीवर अवलंबून आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी म्हणावी तशी थंडी पडत नसल्याने बागायतदार चिंताग्रस्त आहेत.

भातशेती नुकसानी, मच्छिमारांची नुकसानी याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. त्याच प्रकारे आंबा नुकसानीची पाहणी करून बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आता आंबा बागायतदारांमधून होत आहे.

ज्या आशेवर आंबा बागायतदार होते तोच अवकाळी पावसाने पहिल्या टप्प्यातील मोहोर न आल्याने बागायतदारांची पुरती निराशा झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहोर हा डिसेंबर-जानेवारी महिन्यात येतो. त्याचा आंबा एप्रिल-मे महिन्यात तयार होतो.

हंगामाच्या शेवटी आंब्याचा दर गडगडत असल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसतो. तरीही दुसऱ्या टप्प्यातील मोहोराच्या प्रतीक्षेत बागायतदार आहे. मात्र, पडणाऱ्या थंडीवर सर्व अवलंबून आहे, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्यासाठी आता वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.

आम्हांला वाली कोण ?

आंबा बागायतदारांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. त्यामुळे त्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या नुकसानीतून सावरायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. आम्हांला कोणीच वाली नाही का? असा प्रश्न आंबा बागायतदारांकडून विचारला जात आहे.

Web Title:  The mango season will be delayed this year, with conditions in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.