मार्लेश्वर : सगळीकडे नवरात्रोत्सव मोठ्या धुमधडाक्यात सुरु होता तेव्हा संगमेश्वर तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. सद्यस्थितीला तालुक्यात मळभी वातावरणामुळे भातपीक धोक्यात आले असतानाच या वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसण्याची शक्यता असून, यावर्षी आंब्याचा हंगाम लांबणीवर पडण्याची भिती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.तालुक्यात आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीच्या पावसाने थैमान घातले होते. या मुसळधार पडलेल्या पावसाने तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले होते. आताही या पावसाने आपला पवित्रा कायम ठेवला असून, सायंकाळच्या दरम्यान पाऊस बरसायला सुरुवात होत आहे. त्यामुळे सायंकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. भातपीक कापणी झाली आहे. परंतु, पाऊस केव्हाही पडत असल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून नेतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे पहाटेच्या दरम्यान वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण होत असून, सकाळी दाट धुके पसरल्याचेही पहावयास मिळत आहे. दरवर्षी आॅक्टोबर हीट सुरु झाली की, पाऊस जाऊन थंडीला सुरुवात होते. याच काळात आंब्याला पालवी धरु लागते. यावर्षी म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे अजून आंब्याला पालवी धरण्यासही सुरुवात झालेली नाही.आंब्याला एकदा का पालवी धरली की ती जुन होण्यास साधारणपणे ५५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. जून - जुलैमध्ये बागायतदार आंबा कलमांना खते घालतात. तर कलमांना लवकर फळ लागवड व्हावी यासाठी कल्टारचा वापर केला जातो. यावर्षी पावसाच्या अनियमीततेमुळे बागायतदारांनी कल्टारचा वापर केलेला नाही. तसेच घातलेली खतेही कलमांना लागू पडलेली नाहीत. परिणामी बागायतदार चिंतेत सापडले आहेत.यावर्षी पालवीचे प्रमाण कमी असल्याने ती येणार कधी? ती वाढून जुनी कधी होणार? व मोहोर कधी येणार? असे प्रश्न बागायतदारांना पडले आहेत. पालवी जुनी झाल्याशिवाय कलमांना मोहोर येत नाही. (वार्ताहर)गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरुवात झाली होती व जानेवारीमध्ये कलमे फळांनी बहरली होती. यंदा मात्र मोठी समस्या निर्माण झाली आहे.
संगमेश्वरात आंब्याचा हंगाम लांबणीवर?
By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST