Malwana collects maximum fines from tourists traveling without masks | विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांकडून सर्वाधिक दंड वसुली मालवणात

विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांकडून सर्वाधिक दंड वसुली मालवणात

ठळक मुद्देविनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांकडून सर्वाधिक दंड वसुली मालवणातविनामास्क पर्यटकांना रॉक गार्डनमध्ये प्रवेश नाही

मालवण : कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालवण पालिकेकडून शहरात कोरोना खबरदारी नियमांचे काटेकोर पालन सुरू आहे. गेले काही महिने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिवाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढल्याने पालिकेने केलेल्या कारवाईत १० दिवसांत १० हजारांचा दंड वसूल झाला आहे. सर्वाधिक दंड वसुली विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांकडून करण्यात आली आहे.

पर्यटकांचा ओघ वाढल्याने शहरातील सर्व किनारपट्टी भाग व पर्यटन ठिकाणांवर गर्दी आहे. येणारे पर्यटक विनामास्क फिरत असल्याचे दिसून येत आहेत. पालिकेकडे असलेल्या अपुऱ्या कर्मचारीवर्गाची संख्या लक्षात घेता सर्वच ठिकाणी कर्मचारी नियुक्त करणे शक्य नाही. मात्र भरड नाका, बाजारपेठ, रॉक गार्डन, किनारपट्टी याठिकाणी फिरून पालिका कर्मचारी दंड वसुली करीत आहेत.

पर्यटन व्यावसायिक, दुकानदार यांनीही स्वत: मास्कचा वापर करावा. तसेच पर्यटकांना आवाहन करीत मास्कचा सक्तीने वापर करावा अशा सूचना कराव्यात, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

शहरातील हॉटेल व लॉज व्यावसायिकांना पालिका प्रशासनाने सूचनापत्र जारी केले आहे. कोविड खबरदारी नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच मास्क सक्तीबाबत पर्यटकांचे प्रबोधन करावे अशा सूचना पालिका प्रशासनाने हॉटेल व लॉज व्यावसायिक यांना दिल्या आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.

विनामास्क पर्यटकांना रॉक गार्डनमध्ये प्रवेश नाही

मालवण शहरात येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण रॉक गार्डन आहे. याठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला असून विनामास्क असलेल्या कोणत्याही पर्यटकाला रॉक गार्डन येथे प्रवेश दिला जाणार नाही. यासह दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नो मास्क, नो एन्ट्री असे धोरण असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Malwana collects maximum fines from tourists traveling without masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.