मालवण शहर कचऱ्याच्या विळख्यात
By Admin | Updated: July 5, 2015 01:17 IST2015-07-05T01:17:09+5:302015-07-05T01:17:54+5:30
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न : नगरपालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी

मालवण शहर कचऱ्याच्या विळख्यात
सिद्धेश आचरेकर ल्ल मालवण
मालवण शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. अनेक दिवस जमा झालेला कचरा नगरपरिषदेकडून उचलला जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषदेच्या या कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने पुढाकार घेऊन जनतेचा प्रश्न सोडवावा. सुयोग्य नियोजनातून कचरा समस्येतून शहरवासियांना मुक्त करावे अशी मागणी होत आहे.
गेले वर्षभर शहरवासीयांना कचऱ्याचा त्रास होत आहे. रस्ते भुयारी गटार योजनेच्या कामानंतर रखडल्याने तसेच गटार खोदाई पूर्ण न झाल्याने खड्डेमय व पाणी तुंबणाऱ्या या रस्त्यांचा नागरिकांना त्रास होत आहे. शहरातकचरा नगरपरिषदेकडून वेळेत उचलला न गेल्याने कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. कचरा न उचलल्याने मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कचरा कुजून दुर्गंधी पसरली आहे. नगरपरिषद शहरातील नागरिकांकडून वर्षाकाठी हजारो रुपयांची घरपट्टी वसूल करते. वीज, पाणी तसेच आरोग्याच्या सुविधा, डास फवारणी, घनकचरा व्यवस्थापन आदी सुविधा सेवा पुरवणे पालिकेची जबाबदारी आहे.
मात्र, या सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या नगरपालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कचरा साचल्याने डासांचे प्रमाणही वाढले असून संसर्गजन्य रोग पसरू शकतात. नागरिकांचे आरोग्य विचाराधीन ठेऊन पालिकेने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.