समाजात वेगळेपण निर्माण करा
By Admin | Updated: December 26, 2014 00:19 IST2014-12-25T21:27:29+5:302014-12-26T00:19:17+5:30
एम. के. गोंधळी : बांदा येथे आठवे कुमार साहित्य संमेलन

समाजात वेगळेपण निर्माण करा
मडुरा : प्राचीन काळापासून पाषाणाला फार महत्त्व आहे. त्यामुळे आपण दगडातच देव पाहत आलो आहोत. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात आपले मन दगडासारखे होऊ नये, म्हणूनच अशा प्रकारच्या साहित्य संमेलनांची गरज आहे. समाजात आपले वेगळेपण प्रत्येकाने निर्माण केले पाहिजे. त्यामुळेच विद्यार्थी समाजात ओळखला जाऊ शकतो, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिक्षण विभागाचे उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी विद्यार्थी कुमार साहित्य संमेलनावेळी मार्गदर्शन करताना केले.
येथील धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संस्थेच्या खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयातील सभागृहात आठवे नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलन गुरुवारी पार पडले. यावेळी संस्था कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक राजा शिरगुप्पे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे, ज्येष्ठ कथालेखक जयवंत आवटे, सांगली इस्लामपूर येथील कवी प्रा. डॉ. सूरज चौगुले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कुमार साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. ग्रंथाचे महत्त्व विद्यार्थ्यांसह जनमाणसात पोहोचण्यासाठी ग्रंथ दिंडीसह शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गेली अनेक वर्षे बांदा परिसरात अशा प्रकारची साहित्य संमेलने सुरु आहेत. साहित्याच्या जवळ जाण्याची संधी अशाच कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळते. तसेच साहित्यिक वा कवींच्या जडणघडणीचा प्रवासही त्यांना अनुभवयास मिळतो. त्यामुळेच याच विद्यार्थ्यांमधून भावी लेखक व कवी घडतील, अशी आशा आबासाहेब तोरसकर यांनी व्यक्त केली. यानंतर अन्य मान्यवरांनीही समायोजित मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अॅड. नारायण वायंगणकर, सीमा तोरसकर, एल.डी. सावंत, मोहन नाईक, देविदास मोरे, एम. डी. मोरबाळे, प्रमोद सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार कैलास जाधव यांनी मानले. (वार्ताहर)
एकाग्रता महत्त्वाची
साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी समाजाला साहित्यिकाची गरज आहे. आपण आज जे काही आहोत ते शाळेतील शिक्षकांमुळेच. चौथीत असतानाच शिक्षकांनी कविता पाहून आपणास साहित्यिक वा लेखक होऊ शकतोस असे सांगितले. आणि त्यानंतर त्याच प्रेरणेच्या आधारे आज तुम्हासमोर उभा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी श्रवण, निरीक्षण व भ्रमण या तीन गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यानंतर मनन व चिंतनातून कविता स्फुरते. मात्र, त्यासाठी ध्येयासाठीची एकाग्रता महत्त्वाची आहे, असे सांगितले.