स्वच्छता गृह बांधकामाबाबत महाविकास आघाडीने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By सुधीर राणे | Published: May 19, 2023 03:46 PM2023-05-19T15:46:57+5:302023-05-19T15:47:24+5:30

कारवाई न केल्यास  ठिय्या आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

Mahavikas Aghadi complained to the District Collector regarding the construction of sanitation houses in kankavali | स्वच्छता गृह बांधकामाबाबत महाविकास आघाडीने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

स्वच्छता गृह बांधकामाबाबत महाविकास आघाडीने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

googlenewsNext

कणकवली(सिंधुदुर्ग): कणकवली नगरपंचायतच्या जुन्या भाजी मार्केट येथे स्वच्छता गृह बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.अंदाजपत्रकात नमुद असलेले आणि प्रत्यक्षात वापरलेल्या साहित्यामध्ये मोठी तफावत असल्याचे या तक्रारीत माजी नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार अर्जात त्यांनी म्हटले आहे कि, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली  नगरपंचायत भाजी मार्केट येथे स्वच्छतागृह बांधकाम करणे या कामासाठी ८५,९८,८८७ रुपये एवढ्या रक्कमेस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तांत्रिक मंजुरी दिली आहे. स्वच्छता गृह हे जवळपास ८०० स्वे.फु. कार्पेट एरियाचे आहे. तांत्रिक मंजुरीच्या रक्कमेच्या अनुषंगाने प्रति स्वे.फु. १०,५०० रुपये दर या बांधकामाला निच्छित करण्यात आला आहे. एवढा भरमसाट दर कुठल्याच बांधकामाला दिला जात नाही. त्याचबरोबर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाहतुकीचे लीड हे जाणून बुजून जास्त किलोमीटर दाखविण्यात आले आहे. बांधकामासाठी लागणारे स्टील देखील सीआरएसचे वापरणे आवश्यक असताना फुटिंग पासून स्लॅब पर्यंत साधेच स्टील वापरण्यात आले आहे.या भ्रष्टाचारात नगरपंचायत अभियंता देखील सामील आहेत. त्यांच्या डोळ्यादेखत साधे स्टील वापरण्यात आले आहे. 

स्वच्छता गृह बांधकामासाठी ८५,९८,८८७ एवढी रक्कम खर्च केली जाणार असल्याने कॉंक्रीट देखील एम ३० किंवा एम ४० असणे आवश्यक होते. मात्र,त्याठिकाणी एम २० कॉंक्रीट वापरण्यात येत आहे. कणकवली शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेस्ट हाउस बांधकाम देखील सुरु आहे. त्या बांधकामासाठी एम ३० कॉंक्रीट वापरले जात आहे. रेस्ट हाउस व स्वच्छता गृह बांधकाम हि दोन्ही कामे कणकवली शहरातच सुरु आहेत. मात्र, दोन्ही कामांच्या अंदाजपत्रकात मोठी तफावत आढळून येत आहे. स्वच्छता गृहाचे जे काम सुरु आहे ते अंदाज पत्रकानुसार करण्यात आलेले नाही.

स्वच्छता गृह बांधकामात शासनाच्या निधीची उधळपट्टी केली जात असून कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने कणकवली नगरपंचायतीने स्वच्छता गृहासाठी मंजूर झालेल्या शासकीय रक्कमेत मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे स्वच्छता गृहाचे बांधकाम थांबवून या कामाची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर सखोल चौकशी करून कारवाई करावी. अन्यथा भ्रष्ट कारभाराच्या विरोधात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. दरम्यान, कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनाही संबधित निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. यावेळी सुशांत नाईक ,कन्हैया पारकर,रुपेश नार्वेकर,प्रदीप मांजरेकर, सचिन सावंत, प्रमोद मसुरकर, महेश तेली, प्रवीण वरुणकर, नागेश मोर्ये, निलेश मालंडकर, जयेश धुमाळे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Mahavikas Aghadi complained to the District Collector regarding the construction of sanitation houses in kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.