आंबोली मतदारसंघाला कमी निधी; अधिकाऱ्यांना जाब विचारला
By Admin | Updated: June 26, 2014 00:09 IST2014-06-26T00:09:14+5:302014-06-26T00:09:42+5:30
जिल्हा परिषद बांधकाम समिती सभा : सदस्यांची आक्रमक भूमिका

आंबोली मतदारसंघाला कमी निधी; अधिकाऱ्यांना जाब विचारला
सिंधुदुर्गनगरी : प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात निधीचे समान वाटप करा अशा वारंवार सूचना देऊनही आंबोली मतदारसंघासह काही मतदारसंघात कमी निधी देण्यात आला. याबाबत सदस्य आत्माराम पालेकर यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला तर जिल्हा नियोजनकडील निधीतील कामे टक्केवारीवर वाटप केली जात असल्याचा आरोपही सदस्य पालेकर यांनी बुधवारी बांधकाम समिती सभेत केला.
जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती भगवान फाटक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज समिती सभागृहात पार पडली. यावेळी सदस्य सदाशिव ओगले, आत्माराम पालेकर, विष्णू घाडी, सदानंद देसाई, एकनाथ नाडकर्णी, उदय परब, रुक्मिणी कांदळगांवकर, पंढरीनाथ राऊळ आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
आजच्या बैठकीत निधीच्या समान वाटपाच्या मुद्यावरून आत्माराम पालेकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मागील सभेत खोटी माहिती देत सर्व मतदारसंघात निधीचे समान वाटप झाले असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात काही मतदारसंघात जादा निधी देण्यात आला आहे. आंबोली मतदारसंघात १७ लाख तर कारिवडे मतदारसंघात ४० लाख निधी दिला आहे. हा फरक का? असा प्रश्न उपस्थित करत जिल्ह्यात झालेल्या निधी वाटपाबाबत माहिती द्या अशी मागणी केली. तसेच सर्वाधिक पाऊस आंबोली मतदारसंघात पडत असताना पुरहानीचा जादा निधी कोलगाव मतदारसंघात खर्च केला जात आहे. हे योग्य नाही. सभागृहात खोटी माहिती दिली जाते. संबंधित अधिकाऱ्यांकडून टक्केवारीवर निधीचे वाटप केले जात असल्याचा आरोप सदस्य आत्माराम पालेकर यांनी सभेत केला. तर सावंतवाडी तालुक्यातील निधी वाटपाची माहिती द्या अशी मागणी केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी तळवडे १५ लाख, सांगेली २३ लाख, बांदा १९ लाख, कोलगाव ३६ लाख, इन्सुली २३ लाख तर आंबोली १७ लाख निधी मंजूर केला असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
तसेच तालुकानिहाय वाटपात कणकवली १ कोटी ९० लाख, देवगड १ कोटी ९८ लाख, वैभववाडी १ कोटी २० लाख, मालवण १ कोटी ९० लाख, कुडाळ १ कोटी ९३ लाख, सावंतवाडी १ कोटी ९० लाख, दोडामार्ग १ कोटी ९ लाख तर वेंगुर्ला तालुक्यात १ कोटी २६ लाख निधीची कामे मंजूर करण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली. जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणाऱ्या निधीचे सर्व मतदारसंघात समान वाटप झालेच पाहिजे आणि जर तसे समान वाटप झाले नसेल तर निधीचे फेर समान वाटप करा असा ठराव घेण्यात आला तसेच सर्व शिक्षामधून २० वर्गखोल्यांना मंजुरी मिळाली आहे. खोल्या देताना मोडकळीस आलेल्या शाळांच्या ठिकाणीच द्याव्यात. प्रत्येक तालुक्याना समान न्याय द्या अशा सूचनाही सदस्यांनी केल्या. (प्रतिनिधी)