सोशल मीडियावर करडी नजर

By Admin | Updated: September 20, 2014 00:27 IST2014-09-19T23:26:47+5:302014-09-20T00:27:14+5:30

स्वतंत्र समिती ठेवणार लक्ष, मीडियावरील मजकुराचा खर्चात समावेश

Look at the social media | सोशल मीडियावर करडी नजर

सोशल मीडियावर करडी नजर

रत्नागिरी : सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचा किंवा उमेदवारांचा प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने यावेळी चांगलाच चाप लावला आहे. त्याचबरोबर विरोधी उमेदवाराबाबतही काही आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकल्यास त्यावरही आयोगाचा बडगा उगारला जाणार आहे. या निवडणुकीत प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही स्वतंत्र पथक नेमण्यात आले असून त्याच्यामार्फत आता या सर्व सोशल साईटवर लक्ष ठेवले जाणार आहे.
सध्या सर्वत्रच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यामुळे प्रचाराला मोठ्या प्रमाणावर मदत झाली होती. या निवडणुकीतही व्हॉटस् अप, फेसबुक, द्वीटर, स्काईप आदी विविध सोशल साईटचा वापर होणार हे गृहीत धरून निवडणूक आयोगाने या निवडणुकीत सोशल साईटचा वापर करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार इतर जिल्ह्यांप्रमाणेच जिल्ह्यात सोशल मीडियाचा वापर रोखण्यासाठीही स्वतंत्र पथक कार्यरत झाले आहे. आतापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा प्रयत्न झाल्यास तो पक्षाच्या खर्चात अंतर्भूत केला जाणार आहे. उमेदवाराने केलेली कामे तसेच काही आक्षेपार्ह मजकूर टाकला जात आहे का, यावरही नियंत्रण ठेवले जात आहे. यासाठी विविध मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क उपयोगात आणले जात असल्याने या कंपन्यांकडूनही जिल्ह्यातील ग्राहकांची यादी घेतली जाणार असल्याने आक्षेपार्ह मजकूर नेमका कोठून टाकण्यात आला आहे, हे निष्पन्न होईल आणि एकदा ही बाब स्पष्ट झाली की असा मजकूर टाकणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.
एकंदरीत या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी तसेच विरोधकांना नामोहरम करण्याकरिता होऊ शकेल, अशी गाजरे राजकीय मंडळी खुशीत खात होती. मात्र, आता आयोगानेच यावर बडगा उगारल्याने आता आनंदावर विरजण पडले आहे.
एकंदरीत आता सोशल मीडियावर प्रचाराबरोबरच आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांना, त्यांना ‘लाईक’ वा ‘शेअर’ करणाऱ्यांवरही ही समिती वचक ठेवणार असल्याने आता या निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत या सोशल मीडियाचा वापर साऱ्यांनाच जपून करावा लागणार आहे. त्याप्रमाणे असा आक्षेपार्ह मजकूर कुणाला आढळून आल्यास त्यांनी निवडणुक विभागाकडे याबाबत तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Look at the social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.