जगण्यासाठी नव्या उत्साहाने संघर्ष करूया
By Admin | Updated: November 7, 2014 23:42 IST2014-11-07T22:07:55+5:302014-11-07T23:42:45+5:30
केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे... हे फक्त पुस्तकात न राहता खऱ्या अर्थाने जगण्यात यायला हवं!

जगण्यासाठी नव्या उत्साहाने संघर्ष करूया
ब रेच दिवस वाजत-गाजत असलेली निवडणूक म्हणजेच मतदान आणि मतमोजणी या दोन्ही गोष्टी पार पडल्या. व्हॉटस्अॅपवर एकमेकांचा गळा धरणारे पुन्हा एकदा एकमेकांच्या गळ्यात पडले. रत्नागिरीत ‘आदेश’ चालला की ‘धनादेश’ याच्या गप्पाही संपल्या. रत्नागिरीतील कितीजणांना चारचाकी गाडी मिळाली आणि कितीजणांचा कायापालट झाला, याच्या चर्चाही संपल्या. किती जणांची दिवाळी यंदा अधिकच उजळली, याच्याही चर्चांना पूर्णविराम मिळाला. तसं पाहिलं तर आता सर्वसामान्य मतदारांचे काम संपले आहे. पाच वर्षे मनासारखं (स्वत:च्या) काम करायला उमेदवार मोकळे झाले आहेत. उमेदवार वाडीवाडीवर पोहोचले नसले तरी उमेदवारांचे ‘मोला’चे विचार वाडीवाडीवर पोहोचल्यामुळे दिवाळीचा उत्सवही जरा जास्तच आनंदात साजरा झाला आहे. आता गरज आहे ती पुन्हा एकदा कामाकडे वळण्याची. गेल्या अनेक वर्षात आपण आपले हिवाळी, उन्हाळी शेतीचे वैभव हरवून बसलो आहोत, ते परत मिळवण्याची. जिल्ह्यात नदीकिनारी असलेल्या अनेक ठिकाणी कडधान्य आणि भाजीपाला लागवड केली जायची, ही गोष्ट आता भूतकाळापुरतीच मर्यादीत झाली आहे. जगणं नव्याने जगण्यासाठी नव्या उत्साहाने संघर्ष करायला सुरूवात करायला हवी आहे.
कोकण हा निसर्गसंपन्न भाग आहे. इथली माती सुपीक आहे. इथलं वातावरण अतिशय चांगलं आहे. त्यामुळे इथे शेतीमध्ये करण्यासारखे खूप आहे. आता बँका आणि सरकारी योजनांमुळे निधीची उपलब्धताही होत आहे. (त्यात अजून सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे. पण निदान आर्थिक अडचणी तरी कमी होऊ शकतात.) कोकणातच कृषी विद्यापीठ आहे. पिकांप्रमाणेच पिकांशी निगडीत अवजारांबाबतही खूप मोठे संशोधन सुरू आहे. पेरणी, कापणीसाठीही यंत्र विकसित होत आहेत. त्यामुळे शेतीला सहाय्यभूत ठरणाऱ्या अनेक गोष्टींची भर त्यात पडत आहे. पण त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट नाही, ती म्हणजे इच्छाशक्ती.कोकणातील पिकांचा विचार केला तर सर्वात पहिले नाव घेतले जाते आंब्याचे. हापूसने रत्नागिरीला, कोकणला जगभरात ओळख मिळवून दिली आहे. पण आंबा पिकाला आता खूप मर्यादा येऊ लागल्या आहेत. त्यात बेभरवशीपणा खूप आला आहे. मार्च ते मे असे तीन महिनेच आंब्याचा बाजार. त्यातही आपली मानसिकता फक्त आंबा पिकवण्याची. त्याचे मार्केटिंग कोकणाबाहेरचे लोकच करतात. त्यापासूनची जोडउत्पादनंही कोकणाबाहेरचे लोकच घेतात. आंब्याच्या हजारो टन बाटा टाकून दिल्या जातात. पण त्या बाटांमधील गराचा वापर करून जाड पुठ्ठ्याच्या शीटस् तयार केल्या जातात. इमारतीचे पीओपी करताना त्याचा वापर केला जातो. हा व्यवसाय गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात चालतो. कोकणात हजारो टन बाटा वाया जातात. आमरस तयार करण्यातही आता कोकणाबाहेरील लोकांनीच पुढाकार घेतला आहे. कॅनिंग व्यवसायातील कोकणी तरूणांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. काहीशी तशीच गत काजूची आहे. काजूची लाखो टन बोंडे वाया जातात. लांजा तालुक्यातील गवाणेतील आरकेपीसारखा एखादा प्रकल्प वगळला, तर काजूगराचे मोठ्या प्रमाणात काम अभावानेच होते. छोटे-छोटे अनेक प्रकल्प आहेत. पण मोठा प्रकल्प उभारण्याचे धाडस अजून दिसत नाही.
गोव्यात काजूच्या बोंडापासून फेणी तयार केली जाते. फेणीचा विचार केवळ मद्य म्हणून केला जात नाही. औषधासारखाही त्याचा वापर केला जातो. त्याला मागणीही मोठी असते. पण कोकणात असा उद्योग उभारण्यात अनेक अडचणी येतात. त्याला अनेक नियम आडवे येतात. त्यावर मात करण्यासाठी आता नव्या लोकप्रतिनिधींनी पुढे येणे गरजेचे आहे. बास झाली आता पाखाड्या आणि वर्गखोल्यांची कामे. ही कामे आमदारांच्या निधीतून होतच असतात. त्यासाठी कोटीच्या कोटी खर्च केल्याचे दाखले देण्याची गरज नाही. इथल्या किती माणसांच्या हातांना आपण काम दिले, याचा अहवाल आमदारांनी द्यायला हवा आणि लोकांनी तो मागायला हवा.जी बाब आंबा आणि काजूची, तशीच स्थिती कोकम (रातांबे) आणि करवंदाची आहे. कधीकाळी सुरेश प्रभू यांनी राजापूर मतदारसंघाचे खासदार असताना विमानात कोकम सरबत विकले जाईल आणि त्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे स्वप्न दाखवले होते. या स्वप्नाचा त्यांना आणि सर्वसामान्यांनाही विसर पडून गेलाय. आरोग्याला त्रासदायक विदेशी शीतपेयांच्या स्पर्धेत गुणकारी कोकम सरबत कुठेच येत नाही. यावर कुठल्याच लोकप्रतिनिधीने लक्ष दिलेले नाही. कोकम सरबताला फक्त स्थानिक बाजारपेठच आहे. निर्यात हा पुढचा टप्पा. पण राज्यभरात, देशभरात त्याला मार्केट मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा. करवंद आणि फणस या फळपिकांची अवस्थाही तशीच. करवंदापासून वाईन तयार करण्याचे संशोधन कृषी विद्यापीठाकडून सुरू आहे. ते आता अंतिम टप्प्यात आहे. पण त्या तुलनेत करवंदाची लागवड आहे का? मुळात करवंदाची जाणीवपूर्वक लागवड केली जाते का? रस्त्याच्या कडेला किंवा काटेरी कुंपण म्हणून उगवणाऱ्या या फळामध्येही गुणकारी ताकद आहे. त्याला बाजारमूल्य आहे, हे लक्षात आलं तर त्याचीही जाणीवपूर्वक लागवड केली जाईल. ही लागवड आपल्यालाच करावी लागेल. नाहीतर काही वर्षांनी त्यातही परप्रांतीयांचाच वरचष्मा दिसेल.
सद्यस्थितीत जो काही संघर्ष करायचा आहे, तो आपल्यालाच करायचा आहे, हे लक्षात ठेवून पुढे जायला हवे. लोकप्रतिनिधींना पाखाड्या आणि वर्गखोल्यांपलिकडे काहीच दिसत नसल्याने त्यांच्याकडून खूप अपेक्षा करणे, हा आपलाच मूर्खपणा ठरेल. त्यापेक्षा आता आपणच संघर्ष करायला सुरूवात करायला हवी. कुठलीच गोष्ट कमी कष्टात मिळत नाही. आपलं जगणं सुंदर करायचं असेल तर कष्ट करायलाच हवेत. खरं तर कमी कष्ट करूनही खूप काही मिळू शकेल, असं वैभव निसर्गाने कोकणाला दिलंय. या साऱ्या वैभवाचा वापर केला नाही, त्याची जपणूक केली नाही तर पुढच्या काळात हे वैभव आपल्याकडून हिरावून घेतले जाईल. ती वेळ न येण्यासाठी आतापासून संघर्ष करायला हवाय. केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे... हे फक्त पुस्तकात न राहता खऱ्या अर्थाने जगण्यात यायला हवं!--मनोज मुळ्ये