तेलताडमुळे खाद्यतेलाची गरज पूर्ण
By Admin | Updated: January 2, 2015 00:23 IST2015-01-01T21:31:35+5:302015-01-02T00:23:41+5:30
उत्तम महाडकर : तेलताड प्रशिक्षकांकरिता पाच प्रशिक्षण कार्यक्रम

तेलताडमुळे खाद्यतेलाची गरज पूर्ण
कुडाळ : तेलताड हे बदलत्या हवामानाचा फारसा परिणाम न होणारे पीक असून, देशाच्या खाद्यतेल उत्पादनाच्या अभियानात हे पीक अत्यंत महत्त्वाचे, तसेच खाद्यतेलाची वाढती गरज भरून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे आहे, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर यांनी तेलताड प्रशिक्षकांकरिता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपात बोलताना केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित तेलताड प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, राष्ट्रीय तेलबिया आणि तेलताड अभियान, नवी दिल्ली आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तेलताड लागवड व व्यवस्थापन या विषयावर एकूण पाच प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन मुळदे येथील तेलताड प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर नुकतेच झाले.
या प्रशिक्षण कार्यक्रमातून कोल्हापूर, सिंधुुदुर्ग आणि गोवा येथील सुमारे १०५ कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि गोदरेज अॅग्रोव्हेट एकत्रितपणे तेलताड लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यावर भर देणार आहेत.
या संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किसन लवांडे, संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत साळवी, मृदशास्त्रज्ञ डॉ. व्ही. जी. साळवी, तेलताड प्रकल्पाचे माजी प्रमुख प्रा. आनंद कुुंभार, प्रकल्पाचे समन्वयक प्रा. महेंद्र गवाणकर, हवामान शास्त्रज्ञ प्रा. राजेश मुळे, प्रगतशील शेतकरी बाजीराव झेंडे आणि गोदरेजचे विभागीय व्यवस्थापक समीर पैरायकर, आदी मान्यवर तज्ज्ञांनी प्रशिक्षणार्थींना तेलताड तंत्रज्ञान आणि इतर अनुषंगिक बाबींबाबत मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
कृषी विभाग कर्मचाऱ्यांची
महत्त्वाची भूमिका
बदलत्या हवामानामध्ये आंबा व काजू यासारख्या महत्त्वाच्या पिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, शेतकऱ्यांकरिता ही मोठी चिंतेची बाब आहे. परंतु, पर्यायी पीक म्हणून भविष्यात या पिकाचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये करण्याकरिता कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका असून, विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील या तंत्रज्ञानाच्या प्रसाराचा पूल म्हणून जबाबदारी स्वीकारावी, अशी अपेक्षा यावेळी महाडकर यांनी व्यक्त केली.