चूक पुन्हा झाल्यास कायदेशीर कारवाई
By Admin | Updated: November 7, 2014 23:44 IST2014-11-07T21:54:19+5:302014-11-07T23:44:00+5:30
अंकुश जाधव : जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभा

चूक पुन्हा झाल्यास कायदेशीर कारवाई
सिंधुदुर्गनगरी : रमाई व इंदिरा आवास योजनेचे दुबार प्रस्ताव येत असल्याने संतप्त झालेल्या समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी तालुक्यातील अधीक्षक व संबंधित लिपीक यांना धारेवर धरत अशी चूक पुन्हा केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची सभा सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी सदस्य सुरेश ढवळ, सुकन्या नरसुले, धोंडू पवार, सुभाष नार्वेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. कणकवली व मालवण तालुक्यातून रमाई व इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांकडून गेली अडीच वर्षे दुबार प्रस्ताव येत आहेत.
तसेच सर्वच तालुक्यातून विविध योजनेचे प्रस्ताव पाठवितेवेळी विविध त्रुटी असतात. याला सर्वस्वी जबाबदार कार्यालयीन अधीक्षक व संबंधित लिपीक आहेत. या हलगर्जीपणाचा फटका संबंधित लाभार्थ्याला बसत आहे. यापुढे अशाप्रकारे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही यावेळी सभापती जाधव यांनी दिला. तसेच हे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने येतात. त्यामुळे पहिल्यांदा त्यांचा वेतन कपातीचा प्रस्ताव तयार करा, असे सुदेश ढवळ यांनी सांगितले.
डिसेंबरअखेर शिष्यवृत्ती जमा करणार
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डिसेंबरअखेर शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी आॅनलाईन व हाती प्रस्ताव घेण्याचे काम सुरू असून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. मागासवर्गीयांना वाहनचालकांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती अंकुश जाधव यांनी सभागृहात दिली.
वृद्ध कलाकारांना ४ महिन्यांचे मानधन प्राप्त
सन २०१३-१४ साठीचे एकूण ४ महिन्यांचे वृद्ध कलाकारांसाठीच्या मानधनासाठीचा निधी प्राप्त झाला असून लवकरच तो संबंधित कलाकारांना वितरीत करण्यात येणार आहे. मात्र, अद्यापही त्या ६० जणांच्या प्रस्तावाबाबत शासनाकडून कोणताही निधी आला नसून त्यांचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे.
शिलाई मशिनसाठीचे ५० प्रस्ताव प्राप्त झाले असून ते अद्यापही मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच राज्य शासनाचा अद्यापपर्यंत ४० टक्के निधी खर्च झाला असल्याची माहिती सचिव सुनील रेडकर यांनी दिली.
अभिनंदनाचा ठराव
तिन्ही मतदारसंघातून निवडून आलेले आमदार यात नीतेश राणे, वैभव नाईक, दीपक केसरकर यांच्यासह नवनिर्वाचित विषय समिती सभापतींचा अभिनंदनाचा ठराव घेण्यासंदर्भात सदस्य सुरेश ढवळ यांनी सुचविले. याला सर्वानुमते अनुमती देण्यात आली.
कामांची यादी सादर करा
सभेच्या इतिवृत्तात मागासवर्गीय वस्तीमध्ये कोणकोणत्या ठिकाणी कामे केली याची माहिती उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे मत सदस्या सुकन्या नरसुले यांनी व्यक्त करीत नाराजी व्यक्त केली. यापुढे इतिवृत्तात मागास वस्त्यांमध्ये केलेल्या कामांचा आढावा द्यावा, असे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी दिले.
कामकाजाबाबत तीव्र नाराजी
मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत कित्येक योजना राबविल्या जातात. याबाबत प्रचार प्रसिद्धी संबंधित अधिकाऱ्यांकडून होत नसल्याने तळागाळापर्यंत या योजना पोचत नसून लाभार्थी या योजनांपासून वंचित राहतात, असा आरोपही कित्येकवेळा सभापतींनी केला आहे. तसेच त्यातल्या त्यात प्रस्ताव आले तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून ते पूर्ण करून पाठविले जात नाहीत, असेही गेली अडीज वर्षे सभापतींमार्फत सांगितले जात आहे. त्यामुळे सभापती या कामकाजाबाबत पूर्ण नाराज आहेत. पुढे तरी या विभागातील अधिकाऱ्यांचा कारभार सुधारतो का? हे पाहणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)