लांजा : दाेन दुचाकींची समाेरासमाेर झालेल्या धडकेत ताेणंदे (ता.रत्नागिरी) येथील वकिलाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मुंबई - गोवा महामार्गावरील लांजा आयटीआयसमाेर शनिवारी रात्री झाला. ॲड.शैलेश शिवराम जाधव (वय ४५) असे मृत वकिलाचे नाव आहे.शैलेश जाधव हे कामानिमित्त शनिवारी रात्री तोणंदे येथून लांजा येथे दुचाकी (एमएच ०८, एटी ८६७१) घेऊन येत हाेते. ते महामार्गावरील लांजा आयटीआय समोर रात्री ८:४५ वाजण्याच्या दरम्यान आले असता, त्यांच्या दुचाकीची समोरुन भरधाव येणाऱ्या आशिष संदीप घडशी (वय २२, रा.कुर्णे-घडशीवाडी, लांजा) याच्या दुचाकीशी ((एमएच ०८, एडब्लू ००९१) समोरासमोर धडक झाली.आशिष घडशी हा कामावरुन लांजा कुंभारवाडाहून कुर्णेच्या दिशेने जात होता. या अपघातामध्ये ॲड.शैलेश जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर आशिष घडशी हा किरकोळ जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघाताची माहिती मिळताच, लांजा पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, पोलिस उपनिरीक्षक अमोद सरगंळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे, राजेश शिंदे, उमाजी बजागे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आशिष घडशी याच्याविरुद्ध लांजा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करीत आहेत. या अपघाताची माहिती शैलेश जाधव यांचा पुतण्या सुशांत प्रकाश जाधव यांनी लांजा पोलिसांना दिली आहे.
Sindhudurg: दुचाकींची समोरासमोर धडक, तोणंदे येथील वकिलाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:26 IST