पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा वैभववाडीत शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 10:17 PM2020-07-19T22:17:41+5:302020-07-19T22:23:00+5:30

केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना जिल्हा बँकेमार्फत राबविली जात आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने जिल्हा बँकेच्या वैभववाडी शाखेत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड वितरण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Launch of Animal Husbandry Kisan Credit Card Scheme at Vaibhavwadi | पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा वैभववाडीत शुभारंभ

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डचे वितरण सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, प्रमोद गावडे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देपशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा वैभववाडीत शुभारंभशेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्यावर भर : सतीश सावंत

वैभववाडी : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून एखाद्या मोठ्या उद्योगपतीला कोट्यवधीचे कर्ज देण्यापेक्षा छोट्या छोट्या शेतकऱ्यांना शेती कर्जपुरवठा करण्यावर बँकेचा अधिक भर आहे, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे व्यक्त केले.

केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना जिल्हा बँकेमार्फत राबविली जात आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने जिल्हा बँकेच्या वैभववाडी शाखेत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड वितरण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बँकेचे संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, रमेश तावडे, संभाजी रावराणे, नंदू शिंदे, प्रमोद गावडे, शरद सावंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुक्यातील वीसपेक्षा अधिक शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले.

सावंत पुढे म्हणाले, केंद्र शासनाची पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजना प्रभावीपणे राबविणारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राज्यातील एकमेव बँक आहे. योजना शासनाची असली तरी ती शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध हेतूने पोहोचविणारी यंत्रणा सक्षम असणे आवश्यक असते. हे काम सध्या जिल्हा बँक करीत आहे. शेतकऱ्यांनी भातशेती, ऊसशेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय करावेत. त्यातून आर्थिक उन्नती साधावी. या उद्देशानेच ही योजना राबविली जात आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी २ लाख व शेतीसाठी १ लाखापर्यंत कर्जाची मर्यादा आहे. ७ टक्के व्याजाने हे कर्ज दिले जाणार आहे. त्यातील ३ टक्के व्याज केंद्रशासन भरणार असून उर्वरित ४ टक्के व्याज शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. हे ४ टक्के व्याजही राज्य शासनाने भरावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सावंत यांनी सांगितले.

कोरोनातही ७० टक्के परतफेड केली

कोरोनामुळे गेले चार-पाच महिने लॉकडाऊनची स्थिती आहे. तरीदेखील जिल्हा बँकेचा प्रमुख ग्राहक असलेला शेतकरी कर्जाची परतफेड करण्यात कुठेही कमी पडत नाही. यावर्षी कोरोनाचे संकट असतानाही ७० टक्के शेतकऱ्यांनी शेतीकर्जाची परतफेड केली असल्याचे सतीश सावंत यांनी स्पष्ट केले.

योजनेइतकीच तिची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सक्षम हवी. योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची तळमळ संचालक मंडळात हवी. तरच ती योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. हे काम जिल्हा बँक करीत आहे. त्यामुळे विरोधकांनी टीका करू नये, असे आवाहन बँकेचे संचालक दिगंबर पाटील यांनी केले.


 

Web Title: Launch of Animal Husbandry Kisan Credit Card Scheme at Vaibhavwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.