दूध प्रक्रिया प्रकल्प मोजतोय शेवटच्या घटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:11 IST2020-10-08T14:07:57+5:302020-10-08T14:11:40+5:30
Milk Supply, shindhudurg, कणकवली तालुक्यातील वागदे - गोपुरी आश्रमाजवळील शासकीय दूध डेअरी आता शेवटच्या घटका मोजत आहे.

दूध प्रक्रिया प्रकल्प मोजतोय शेवटच्या घटका !
सुधीर राणे
कणकवली : कणकवली तालुक्यातील वागदे - गोपुरी आश्रमाजवळील शासकीय दूध डेअरी आता शेवटच्या घटका मोजत आहे. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या दूध प्रक्रिया प्रकल्पाकडे लोकप्रतिनिधिंबरोबरच शासनाचे अक्षम्य असे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या शासकीय डेअरीचे कामकाज गेल्या ५ वर्षांपासून पूर्णपणे ठप्प झाले असून तेथील कोट्यवधींची मशिनरी गंजली आहे.
२६ डिसेंबर १९६६ रोजी वागदे येथे शासकीय दूध डेअरीची स्थापना करण्यात आली. संपूर्ण सिंधुदुर्गातून या डेअरीत दूध संकलन केले जात असे. ज्यावेळी शिवसेना - भाजप युतीचे शासन पहिल्यावेळी राज्यात आले. त्यावेळी सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले नारायण राणे दुग्धविकास मंत्री झाले. त्यांच्या कार्य काळात सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून वागदे येथे शासकीय दूध डेअरीची अद्ययावत इमारत उभारण्यात आली.
तसेच केंद्र शासनाच्या एकात्मिक दूग्ध विकास योजनेंतर्गत शेतकर्यांना दूधाळ जनावरे अनुदान तत्वावर वाटप करण्यात आली होती. नवीन डेअरीमध्ये अद्ययावत दूध पॅकिंग मशीन, दूध निर्जंतुकीकरण, दूध एकजिवीकरण, दूध शीतकरण, ५ टनाचा बर्फ कारखाना, प्रत्येकी ५ हजार लिटरच्या दूध संकलनासाठी ४ टाक्या, दहा मोठ्या गाड्या, दोन जीप, १० हजार व्हॅटचा जनरेटर अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. तर दूग्धशाळा व्यवस्थापक, १२ पर्यवेक्षक, ३३ मजूर, पहारेकरी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह एकूण ७४ कर्मचारी येथे कार्यरत होते. ' आरे ' ब्रॅण्डच्या नावाखाली ग्राहकांना या डेअरीतून दर्जेदार दूध मिळत असे. तर दरदिवशी अडीच ते तीन हजार लीटर आरे ब्रॅण्डचे दूध पॅकिंग होत असे.
२०१५ पासून कामकाज पूर्णपणे ठप्प !
सन २०१३ पर्यंत या डेअरीत १० ते १२ हजार लीटर दूध संकलन होत होते. गावागावात ११० दुग्धविकास संस्था मार्फत गाड्या पाठवून दूधाचे संकलन केले जात असे. तसेच मिरज, चिपळूण आदी शासकीय डेअरीतून दूध आणले जात असे. जुलै २०१३ पासून या डेअरीचे कामकाज हळूहळू ठप्प होऊन दूध संकलन बंद करण्यात आले. त्यानंतर २ वर्षे गोकुळ दूध संघाने त्यांच्याकडील दूध थंड करण्यासाठी या डेअरीचा वापर केला. मात्र , त्यानंतर त्यांनी स्वतःचे कोल्ड स्टोरेज उभारल्यानंतर तेही बंद झाले . तर सन २०१५ पासून या डेअरीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले !
२०१७ मध्ये तत्कालीन दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी या शासकीय डेअरीला भेट दिली होती. त्यावेळी या डेअरीच्या नुतनीकरणाचा ४० लाखाचा प्रस्ताव त्यांच्याकडे देण्यात आला होता. २० कर्मचार्यांची नियुक्ती आणि डेअरीचे नुतनीकरण केल्यास ही डेअरी पुन्हा एकदा कार्यान्वित करणे शक्य आहे.असेही त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्यावेळी डेअरी पुनरूज्जीवनाचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे.