वैभववाडी: करुळ घाटात आज, शुक्रवारी सकाळी दरड कोसळली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली. ही वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली. जेसीबीच्या सहायाने दरड हटवून मार्ग तासाभराने सुरळीत करण्यात आला.गेले चार दिवस तालुक्यात मान्सून पुर्व पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाचा तडाखा करुळ आणि भुईबावडा घाटमार्गाला बसत आहे. गगनबावड्यापासून ३ किमी अंतरावर करुळ घाटात आज सकाळी ७ वाजता दरड कोसळली. मुख्य रस्त्यावर मातीसह दगड पडल्याने रस्त्याचा निम्म्याहून अधिक भाग व्यापला होता. त्यामुळे अवजड वाहतूक पुर्णता ठप्प झाली होती.या दरम्यान या मार्गावरील एसटी वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली होती. जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवून मार्ग तासाभराने सुरळीत करण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी करुळ घाटात दरड कोसळली असून वाहन चालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
Kolhapur: करुळ घाटात दरड कोसळली; तासभर वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:58 IST