शेती, बागायतींचे लाखोंचे नुकसान
By Admin | Updated: July 17, 2014 23:08 IST2014-07-17T23:02:40+5:302014-07-17T23:08:30+5:30
तेरेखोल नदीला उधाण : सिमेंट काँक्रिटची भिंत बांधण्याची मागणी

शेती, बागायतींचे लाखोंचे नुकसान
बांदा : तेरेखोल नदीच्या उधाणामुळे बांदा येथील रामनगर, मिठगुळी परिसरातील शेकडो एकर शेती बागायती नदीपात्रात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी सिमेंट काँक्रिटची संरक्षक भिंत बांधण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
या परिसराला दरवर्षी तेरेखोल नदीच्या उधाणाचा फटका बसतो. आतापर्यंत शेकडो एकर शेती बागायती नदीच्या पाण्यात वाहून गेली आहे. यामुळे बांदा व आरोसबाग येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी आरोसबाग येथील संजय चांदेकर यांच्या बागायतीला या उधाणाचा फटका बसला. त्यांच्या बागायतीमधील चार माड व ९ पोेफळी नदीपात्रात वाहून गेल्या. तर कित्येक गुंठे बागायतींची जमीन खचली आहे.
पावसाळ्यात तेरेखोल नदीपात्र दुथडी भरुन वाहते. नदीपात्रालगत शेतकऱ्यांनी नारळ, सुपारी, आंबा, फणस, सागवान बागायती फुलविल्या आहेत. तेरेखोल नदीचे पाणी या बागायतीत घुसत असल्याने येथील जमीन पूर्णपणे खचली आहे. यावर्षी नदीच्या उधाणाचा मोठा फटका बागायतींना बसला आहे.
पावसाळ्याच्या दोन महिन्यातच शेकडो एकर बागायती नदीपात्रात वाहून गेली आहे. बांदा परीसरातील रामनगर, मिठगुळी परिसरातील नारळ, सुपारींची झाडे नदीपात्रात उन्मळून पडली आहेत. बांदा व आरोसबाग येथील शेतकऱ्यांच्या बागायती याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत.
तेरेखोल नदीच्या उधाणामुळे या बागायतींना नेहमीच फटका बसत असल्याने याठिकाणी खारलॅण्ड बंधारा बांधण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. तीन वर्षापूर्वी याठिकाणी तीस मिटर लांबीचा बंधारा बांधण्यात आला. याचा फायदा देखील झाला. मात्र, रामनगर, मिठगुळीपर्यंत बंधारा बांधण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. मेरीटाईम बोर्डाने दरवर्षी तीस मिटर बंधारा बांधण्याचे प्रस्तावित केले. मात्र, गतवर्षी बंधारा बांधण्यास निधी मंजूर न झाल्याने संरक्षक भिंतीचे काम रखडले. यावर्षी मोठ्या प्रमाणात जमीन खचल्याने यावर्षी विशेष बाब म्हणून संरक्षक भिंत बांधून मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
लाकडी साकवही अडचणीत
आरोसबाग ग्रामस्थ दरवर्षी बांद्यात येण्यासाठी उन्हाळ्यात तेरेखोल नदीपात्रावर श्रमदानाने लाकडी साकव उभारतात. मात्र, साकव उभारताना बांद्याकडील नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात जमीन नदीपात्रात कोसळल्याने यावर्षी साकव बांधणे धोकादायक बनले आहे. अजून दोन महिने पावसाळा शिल्लक असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमीन खचण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षी आरोसबागवासीयांना बांद्यात येण्यासाठी होडीचाच आधार घ्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)